महिनाभरातच उरकला खरीप हंगाम

By Admin | Updated: July 30, 2015 00:10 IST2015-07-30T00:10:27+5:302015-07-30T00:10:27+5:30

बीड : यंदा पावसाचे आगमन वेळेवर झाल्याने १५ जुनला जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीला सुरवात झाली. मात्र १५ जुन ते १५ जुलै या कालावधीतच खरीपाचा पेरा, मशागत

Urakh kharif season within a month | महिनाभरातच उरकला खरीप हंगाम

महिनाभरातच उरकला खरीप हंगाम


बीड : यंदा पावसाचे आगमन वेळेवर झाल्याने १५ जुनला जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीला सुरवात झाली. मात्र १५ जुन ते १५ जुलै या कालावधीतच खरीपाचा पेरा, मशागत व पावसाने ओढ दिल्याने पिके मोडण्याची नामुष्कीही बळीराजावर आली आहे. तीन ते साडेतीन महिने चालणाऱ्या खरीप हंगाम यंदा मात्र केवळ महिन्याभरातच उरकला आहे.
हंगामाच्या सुरवातीच्या काळात पावसाने जिल्ह्यात हजेरी लवली होती. त्या तोडक्या पावसाच्या जोरावरच खरीपाची पेरणी करण्यास सुरवात झाली होती. तुरळक ठिकाणी पाऊस होत असल्याने जिल्ह्यात २४ जुनपर्यंत २ लाख ७५ हजार २१४ हेक्टरवर म्हणजेच सरासरी लागवड क्षेत्रापैकी ४९ टक्के पेरा झाला होता. जुन अखेर पावसाने ओढ दिल्याने ४ लाख ८ हजार ३१६ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. गतवर्षीप्रमाणेच यंदाही शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन या दोन मुख्य पिकावरच शेतकऱ्यांनी भर दिला होता. जिल्ह्यात खऱ्या अर्थाने जुलै महिन्यातच खरीपाचा पेरा केला जातो. मात्र, जुलै महिन्याच्या सुरवातीपासून पावसाने दडी मारली होती. परिणामी पेऱ्यात घट होत गेली. पावसाने ओढ दिल्याने खरीपातील पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी हलक्या मशागतीस सुरवात केली. आहे ती पिके जोपसण्याचा अट्टाहास शेतकऱ्यांनी केला. मात्र तब्बल गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात पाऊस निरंक असल्याने पिके जागच्या जागी जळून जात आहेत.
जोमात आलेल्या पिकांना उभारी देण्यासाठी शेतकऱ्यांनी एक ना अनेक प्रयत्न केले. धारुर तालुक्यातील कासारी परिसरात तर शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा करून पिके जगविण्याचा केविलवाणा प्रयोग केला मात्र पावसाने हजेरीच लावली नसल्याने जिल्ह्यातील जवळपास ५ लाख २१ हजार ३४४ हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहे. कृषि विभगाकडून ३१ जुलैपर्यंत पाऊस न झाल्यास २ लाख ३४ हजारावर दुबार पेरणीची शक्यता वर्तिवण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात यापैक्षाही अधिकच्या पिकांचे नुकसान झाले असल्याचे समजत आहे. पाण्याअभावी व सोसाट्याच्या वाऱ्याने पिकांची वाढ खुंटली आहे.
पाऊस पडल्यास दुबार पेरणी अन्यथा रब्बीची तयारी या उद्देशाने अनेक शेतकरी उभ्या पिकावर नांगूर फिरवत आहेत. माजलगांव, अंबाजोगाई आदी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकांची मोडणी करण्यास सुरवात केली आहे.
गत तीन वर्षाचे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदाही कापूस व सोयाबीनवरच भर दिला होता. याकरिता हंगामपुर्व जमिनीची मशागत, पेरणी त्यानंतर पिकांची मशागत तसेच पिकांची जपवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृत्रिम प्रयत्नही केले मात्र सरतेशेवटी खरीप यंदाही फेल गेला असल्याची परिस्थिती आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात झालेल्या पीक मोडणीचा हेक्टरी आकडा अद्यापपर्यंत कृषि विभागाकडे आला नसल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे १५ जुलैला सुरवात झालेला खरीप हंगाम केवळ पावसाअभावी महिन्याभरातच मोडीत काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे उत्पादनात तर घट होणारच आहे शिवाय लाखोंची बि-बीयाणे जमिनीत गाडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे.

Web Title: Urakh kharif season within a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.