अपडाऊन तलाठ्यांचा वसमतला सामूहिक सज्जा
By Admin | Updated: June 26, 2014 00:40 IST2014-06-26T00:31:41+5:302014-06-26T00:40:43+5:30
वसमत : तालुक्यातील बहुतेक तलाठी नांदेड, परभणी, हिंगोली आदी शहरातून अपडाऊन करतात. सवड मिळाली तर महिन्यातून एखादेवेळी सज्जाला भेट देऊन येतात.
अपडाऊन तलाठ्यांचा वसमतला सामूहिक सज्जा
वसमत : तालुक्यातील बहुतेक तलाठी नांदेड, परभणी, हिंगोली आदी शहरातून अपडाऊन करतात. सवड मिळाली तर महिन्यातून एखादेवेळी सज्जाला भेट देऊन येतात. काही तलाठ्यांनी वसमत जवळच सामूहिक सज्जे उभारले आहेत. येथे बसूनच ते सज्जाचे कामकाज करत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
तालुक्यात एकूण ३६ तलाठी सज्जे आहेत. प्रत्येक तलाठ्याने सज्जाच्या मुख्यालयी राहावे व सर्व कामे मुख्यालयीच करावीत, असा नियम आहे; परंतु वसमत तालुक्यातील एकही तलाठी सज्जाच्या ठिकाणी राहत नाही. हा प्रकार बुधवारी ‘लोकमत’ च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आला आहे. बहुतेक तलाठी सज्जे हे तलाठ्यांच्या घरीच वसमत येथे आहेत. अनेक तलाठी तर बाहेरच्या जिल्ह्यात वास्तव्यास असून, सवडीप्रमाणे ते वसमतला येतात. सज्जावर तर महिनोगणती अनेक तलाठी फिरकतही नसल्याचेही समोर आले आहे. आसेगाव तलाठी सज्जास सदर प्रतिनिधीने बुधवारी सकाळी ९ वाजता भेट दिली असता महसूल विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला. आसेगाव सज्जाच्या तलाठी श्रीमती कोहर या गेल्या महिनाभरापासून आसेगावकडे फिरकल्याही नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अन्न सुरक्षा योजनेची यादी वाचण्यासाठी त्या एकदा तासभरासाठी आसेगावात आल्या होत्या. ग्रामस्थांना तलाठ्यास भेटण्यासाठी वसमत येथे श्रीस्वामी समर्थ मंदिरामागे असलेल्या त्यांच्या कार्यालयात जावे लागते. तेथेही त्या कधी येतील हे नक्की नसते. अनेकदा दिवसभर थांबून ग्रामस्थांना रिकाम्या हातानेही परतावे लागते. अत्यंत लहरी कारभार असल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत.
सदर प्रतिनिधीने ११ वाजता टाकळगव्हाण येथे भेट दिली असता तेथील तलाठी पुजारी हे गावाकडे कधी तरी येतात. गरजू ग्रामस्थांना त्यांना शोधण्यासाठी वसमतला चकरा माराव्या लागत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. सदर प्रतिनिधीने साडेअकरा वाजता आसेगाव सज्जाच्या तलाठी कोहर यांच्या वसमत येथील खासगी कार्यालयास भेट दिली असता ते कुलूप बंद होते. आसेगाव येथील अनेक ग्रामस्थ कार्यालयाबाहेर ताटकळत उभे होते. मॅडम ३ वाजता येतील, असे तेथील एका एजंटने सांगितले. सदर प्रतिनिधी २ वाजता पुन्हा त्या कार्यालयाकडे गेला असता धक्कादायक प्रकार समोर आला. कोहर यांच्या खासगी कार्यालयातच इतर अनेक तलाठ्यांचेही कार्यालय असल्याचे पहावयास मिळाले. कार्यालयात शालेय प्रमाणपत्रावर स्वाक्षऱ्या घेण्यासाठी आसेगाव, सुनेगाव आदी भागातील पालक महिला, पालकांसह ग्रामस्थांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. तलाठी कोहर यांना आसेगाव सज्जावर का जात नाहीत, असे विचारले असता त्यांनी कोणाचे काम अडते काय? असा प्रतिप्रश्न केला.
ग्रामस्थांना वसमतला येण्याचा भुर्दंड बसतो, असे सदर प्रतिनिधीने विचारले असता तलाठी मॅडम म्हणाल्या की, भुर्दंड कसा खेड्याचे लोक उठले की वसमतला येतात मग तलाठ्याला भेटण्याचाच भुर्दंड कशाचा? असा प्रश्न त्यांच्या कार्यपद्धतीची साक्ष देणारा होता. त्यांच्या कार्यालयामागच्या खोली बाहेरही ग्रामस्थ बसलेले होते. त्यांच्याशी चर्चा केली असता ते गुंडा, करंजी या भागातील असल्याचे समजले. तेथे गुंडा सज्जाचे तलाठी भद्रे यांचे कार्यालय आहे. तलाठी भद्रे गावाकडे येत नाहीत. येथेच स्वाक्षरीसाठी यावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याच शेजारी इतर दोन खोल्या कुलूपबंद होत्या. त्यातही तलाठी कार्यालयच असल्याचे समोर आले. येथे कार्यालय असलेले बहुतेक तलाठी नांदेड, परभणीहून अपडाऊन करणारे आहेत. तलाठ्यांचे हे खासगी सज्जे वजा सामुहिक संपर्क कार्यालय नावाचा प्रकार महसूल विभागात तलाठी कसा कामकाजाचा बोजवारा उडवत आहेत. (वार्ताहर)
कोण, कोठून ये-जा करते...
वसमत तालुक्यातील बाभूळगाव, हयातनगर सज्जाचे तलाठी विभूतदार, हट्टा येथील तलाठी गिते, अकोलीचे तलाठी दिक्षीत हे परभणीहून अपडावून करतात. आसेगाव सज्जाच्या तलाठी कोहर, कौठ्याचे तलाठी तेलेवार, रिधोऱ्याचे इंगोले, जोंधळे व कुरूंदवाडी, पळसगाव सज्जाचे तलाठी नांदेडहून अपडाऊन करतात. करंजाळाचे आडे, पांगरा शिंदेचे मुंडे, आंबा सज्जाचे डुकरे हे तलाठी हिंगोलीहून अपडाऊन करत असतात. यांच्यासह इतरही अनेक तलाठी विविध गावातून अपडाऊन करतात. तालुक्यातील सज्जाच्या ठिकाणी अधिकृत सज्जा कार्यालयेही तलाठ्यांची नाहीत. अनेक तलाठ्यांनी खासगी कर्मचारी लावून ‘कारभार’ सुरू केला आहे. अपडाऊन करणारे तलाठ्यांचे मोबाईल स्विचआॅफ किंवा नॉट रिचेबल असतात. त्यामुळे अशा तलाठ्यांना शोधता शोधता ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या पालकांना पायपीट करावी लागत असल्याचे धक्कादायक चित्र बुधवारी पहावयास मिळाले.