टाकावू वाणाच्या सामानावर होतोय अनाठायी खर्च
By Admin | Updated: January 14, 2016 23:13 IST2016-01-14T23:07:35+5:302016-01-14T23:13:12+5:30
वसमत : संक्रांतीनिमित्त वाणाचे सामान खरेदी करण्यासाठी बाजारात महिलांची गर्दी होत आहे. त्याची दुकानेही मोठ्या संख्येने थाटलेली आहेत

टाकावू वाणाच्या सामानावर होतोय अनाठायी खर्च
वसमत : संक्रांतीनिमित्त वाणाचे सामान खरेदी करण्यासाठी बाजारात महिलांची गर्दी होत आहे. त्याची दुकानेही मोठ्या संख्येने थाटलेली आहेत. मात्र बहुतेक साहित्य हे कोणत्याही उपयोगाचे नाहीत. तरीही महिला एकमेंकींना वाण देण्यासाठी पैसे मोजून या टाकावू वस्तू खरेदी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
मकरसंक्रांत हा महिलांचा महत्त्वाचा सण आहे. यामध्ये महिलांचे एकमेकींना वाण देण्याचा कार्यक्रम घरोघर होते. त्यानिमित्ताने महिलांच्या गाठी-भेटी व मैत्री वृद्धिंगत होत असते. मात्र वाण देताना ज्या वस्तू वापरल्या जातात त्या बहुतेक टाकाऊ दर्जाच्याच असतात. ज्यांना हे वाण म्हणून दिले जाते त्यांच्याही उपयोगाची ती वस्तू ठरत नाही. वाण देणाऱ्या महिलांनी मात्र पैसे मोजून ती वस्तू खरेदी केलेली असते. असा हा दोन्ही बाजूंनी नुकसानीचा व व्यापाऱ्यांना मात्र प्रचंड फायद्याचा प्रकार आहे.
प्रत्येक घरी किमान २०० ते ३०० महिलांना वाण दिले जाते. स्वत:चे वाण वाटावे, अशी बाजारातून पाच ते दहा रुपयांपर्यंतची वस्तू शोधली जाते. यात मग लहान-लहान वाट्या, ग्लास, प्लास्टिकचे चमचे, डब्बे, टोपल्या, आरती, पेन, कांड्या आदी वस्तूंचाच भरणा असतो. यापैकी एकही वस्तू घरी वापरता येत नाही. त्यांचा कचराच होतो, हे उघड चित्र असतानाही वाणासाठी किमान प्रत्येक घरी ५०० ते हजार रुपयांचा खर्च होतो. वाण वाटणाऱ्या व घेणाऱ्या महिलांची संख्या याचा हिशेब लावला तर होणारा खर्च डोळे फिरवणारा ठरत आहे. मात्र या बाबीकडे अद्याप कोणी गांभीर्याने पाहिलेले नाही. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता अशा टाकाऊ वाणाच्या साहित्यावर खर्च करण्याऐवजी काही तरी दैनंदिन गरजेच्या वस्तूचा वापर व्हावा, अन्यथा तसे साहित्य घेवू नये व देवूही नये, असा विचार समोर येणे गरजेचे आहे. महिला मंडळांनी वाण देण्याघेण्याच्या कार्यक्रमाद्वारे अशा व्यर्थ खर्चास फाटा देण्याबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. वर्षभर जे साहित्य गोदामात पडून आहे, ते वाणाचे साहित्य म्हणून विकण्यासाठी विक्रेत्यांनी बाहेर काढल्याचे सध्याचे चित्र आहे.
स्वस्त म्हणून गंज लागलेली भांडीही विक्री होताना दिसत आहेत. प्लास्टिकच्या वस्तू तर एवढ्या तकलादू असतात की अनेकदा घरी जाईपर्यंतही तडकतात. अशा टाकावू वस्तूंवर व्यर्थ का केला जातो हे मात्र कोडेच आहे. या पैशांतून एखादे सामूहिक विधायक कार्याचे उभे राहिले तर ते खऱ्या अर्थाने सामाजिक ऋण फेडण्याचे वाण ठरू शकते. या दृष्टिने महिलांनी विचार करून खऱ्या अर्थाने टाकावू वाणावरच संक्रांत आणण्याची गरज आहे. (वार्ताहर)