कन्नड (छत्रपती संभाजीनगर): तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, अनेकांच्या घरांची पडझड होऊन संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहेत. बुधवारी मध्यरात्री १२ ते गुरुवारी पहाटे ३ वाजेपर्यंत कन्नड शहरासह तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने थैमान घातले. यामध्ये एका घराची भिंत कोसळून १२ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत.
मृत मुलीचे नाव आयशा अशपाक शेख (वय १२, रा. छम्मन का बंगला, कन्नड) असे आहे. ही दुर्घटना मोहन रामप्रसाद भारुका आणि ओम रामप्रसाद भारुका यांच्या जुन्या घराची भिंत शेजारील अशफाक शेख यांच्या घरावर कोसळल्याने घडली. या दुर्घटनेत पेंटर काम करणारे अशपाक रज्जाक शेख, सादिया अशपाक शेख, रिजवान अशपाक शेख, जिसान अशपाक शेख हे गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या शेजारी राहणारे अर्शीद वाहेद शेख, हिना अर्शिद शेख, अशान अर्शिद शेख (सर्व रा. छम्मन का बंगला) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनेनंतर उपविभागीय अधिकारी व नगरपरिषद प्रशासक संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण कडवकर आणि मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मंडळ अधिकारी रमेश चव्हाण यांनी पंचनामा केला. मात्र, तलाठी नितीन मगरे हे घटनास्थळी अनुपस्थित होते, कारण ते सुट्टीवर गेले होते.