पालिका सभेत अभूतपूर्व गोंधळ
By Admin | Updated: February 28, 2017 00:56 IST2017-02-28T00:56:11+5:302017-02-28T00:56:34+5:30
जालना : पाणीटंचाई, बांधकाम परवाने, रस्त्यांची एनओसी, स्वच्छता आदी विविध मुद्यांवरून सोमवारी झालेली जालना नगर परिषदेची सभा चांगलीच गाजली.

पालिका सभेत अभूतपूर्व गोंधळ
जालना : पाणीटंचाई, बांधकाम परवाने, रस्त्यांची एनओसी, स्वच्छता आदी विविध मुद्यांवरून सोमवारी झालेली जालना नगर परिषदेची सभा चांगलीच गाजली. गदारोळातच ३३ विषयांना मंजुरी देण्यात आली. मंजूर विषयांचा विरोधीपक्ष सदस्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. एकूणच दमदाटी, आरेरावी आणि शिवराळ भाषेमुळे सभागृह काही वेळ स्तब्ध झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सोमवारी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल उपस्थित होत्या. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर उपस्थित होते. प्रारंभीच राष्ट्रवादीचे नगरगसेवक शाहआलम खान यांनी जुना जालन्यात २५ दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. याबाबत पालिकेची काय उपाययोजना आहे. याचा मुख्याधिकाऱ्यांकडे खुलासा मागतिला. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे सांगून त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. रेणुका पाटील-निकम यांनीही याच मुद्यावरून पालिकेने काय पर्यायी योजना केली याचा जाब विचारला.
गांधी चमन ते मोतीबाग हा मार्ग चांगला असतानाही तो खोदल्याबद्दल अनेक नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सहा वर्षांपूर्वी जे रस्ते झाले आहेत. अशाच कामांना एनओसी देण्यात यावी, असे शासनाचे आदेश होते. ते धाब्यावर बसविण्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. पाणी पुरवठ्याच्या प्रश्नांवरून स्वीकृत सदस्य बाला परेदशी यांनी तत्कालीन नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांच्या काळात शहराला चार दिवसांतून एकदा पाणी मिळत होते. सध्या तर १५ दिवस पाणीपुरवठा केला नसल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप केला. त्यावर महावीर ढक्का यांच्यासह काँग्रेसच्या नगरसेवकांनी चार दिवसांआड कधीही पाणी मिळत नव्हते असे सांगत सद्यस्थितीत शहरातील विविध भागांतील जीर्ण झालेली जलवाहिनी आणि जायकवाडी धरणाजवळील व्हॉल्व हवेच्या दाबामुळे फुटल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे सांगितले. जायकवाडी ते जालना जलवाहिनी व्हॉल्व्ह दुरूस्तीचे काम सुरू असून पाणीपुरवठा लवकरच सुरू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरु झाल्यानंतर निश्चितपणे पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वीकृत सदस्य विजय चौधरी यांनी एका रस्त्याची दोनद निविदा काढून बिल उचलण्यात आल्याचे पुराव्यानिशी सादर केले. सदर प्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी खांडेकर यांनी दिले. शिवसेना गटनेते विष्णू पाचफुले यांनी बांधकाम परवाना मुद्द्यावरुन मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरत तात्काळ परवाने देण्याची मागणी केली. विरोधी पक्षाचे भास्कर दानवे, लक्ष्मीकांत पांगारकर, शशिकांत घुगे, विशाल बनकर व अन्य नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत प्रत्येक विषयाची चर्चा झाल्यानंतरच विषयांना मंजुरी देण्याची मागणी लावून धरली. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या चांगलीच शाब्दीक चकमक उडाली. काँग्रेसचे बांधकाम सभापती महावीर ढक्का यांनी आक्रमक भूमिका घेत अन्य नगरसेवकांनीही विषय मंजूर मंजूर म्हणून राष्ट्रगीत लावण्याची मागणी केली. त्याचवेळी महावीर ढक्का आणि शशिकांत घुगे, विशाल बनकर यांच्यात राष्ट्रगीत लावण्यावरून धक्काबुकी व शिवीगाळ झाल्याने सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर ज्येष्ठ सदस्यांच्या मध्यस्तीनंतर सभा पुन्हा सुरू झाली. बांधकाम वर्गीकृत रिंंग रस्त्याचे पालिकेकडे हस्तांतर करण्यास मंजुरी देण्यात आली यावर भास्कर दानवे व शशिकांत घुगे यांनी जोरदार हस्तक्षेप घेतला.
पालिकेची आर्थिक स्थिती ठिक नसताना हे रस्ते घेतल्यावर पालिका त्याची देखभाल करू शकेल का यावर दोन्ही नगरसेवकांनी खुलासा मागितला. सभेस नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)