विद्यापीठाचे उपकेंद्र नावालाच !
By Admin | Updated: March 28, 2015 00:45 IST2015-03-28T00:28:03+5:302015-03-28T00:45:37+5:30
हणमंत गायकवाड ,लातूर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र लातुरात सात वर्षांपूर्वी स्थापन झाले आहे. मात्र या उपकेंद्राचा ना विद्यार्थ्यांना फायदा ना महाविद्यालयांना.

विद्यापीठाचे उपकेंद्र नावालाच !
हणमंत गायकवाड ,लातूर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र लातुरात सात वर्षांपूर्वी स्थापन झाले आहे. मात्र या उपकेंद्राचा ना विद्यार्थ्यांना फायदा ना महाविद्यालयांना. त्यामुळे विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील कर्मचारी, प्राध्यापकांची ‘नांदेड’वारी कायमच आहे. महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज लातुरातच व्हावे म्हणून उपकेंद्राची निर्मिती झाली. मात्र हा उद्देश असफल आहे.
स्वारातीम विद्यापीठाअंतर्गत लातूर जिल्ह्यात वरिष्ठ महाविद्यालयांची संख्या १३९ आहे. त्याखालोखाल नांदेड जिल्ह्यात १३१, परभणीत ८६, तर हिंगोली जिल्ह्यात ३६ महाविद्यालये आहेत. विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांची संख्या तर लातूरची अधिक आहेच. विद्यार्थी संख्याही या जिल्ह्याच्या तुलनेत लातूरचीच अधिक आहे. विद्यापीठाच्या नोंदीत एकूण ८७ हजार विद्यार्थ्यांपैकी ३५ हजार विद्यार्थी लातूर जिल्ह्याचे आहेत. त्यामुळे विद्यापीठावरील प्रशासकीय कामकाजाचा भार कमी व्हावा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी १३ नोव्हेंबर २००७ रोजी उपकेंद्राची घोषणा केली. याला साडेसात वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र परीक्षा फॉर्म, डिग्री फॉर्म, पात्रता फॉर्म, संलग्नीकरणाचे कामकाज तसेच पीएच.डी. प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट, पीएच.डी.ची मुलाखत, मायग्रेशन, रि-चेकिंग, रि-काऊंटिंगच्या आदी साध्या कामकाजासाठी लातूरच्या विद्यार्थ्यांना नांदेडवारी करावीच लागत आहे.
उपकेंद्र १० एकर जागेमध्ये वसले आहे. लगत असलेली सामाजिक वनीकरणाची आणखीन १२ एकर जागा मिळणार आहे. प्रशस्त वातावरण पाहता व्यवस्थान परिषदेत प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांनी प्रशासकीय कामकाजाची मागणी लावून धरली होती. मात्र प्रशासनाने बगल दिली.
उपकेंद्रात एकूण १४ पदव्युत्तर अभ्यासक्रम चालतात. परंतु, हे अभ्यासक्रम लातूर शहरातील महाविद्यालयांत यापूर्वीच सुरू आहेत. ‘दयानंद’मध्ये तर संशोधन केंद्र आहे. शाहू महाविद्यालयात अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. बसवेश्वर महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सोय आहे.
विद्यापीठ उपकेंद्र अभ्यासक्रमाबरोबर जिल्ह्याच्या प्रशासकीय कामकाजासाठी हवे. एज्युकेशन हब असल्यामुळे लातूरकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. पण उपकेंद्रात वसतिगृह नसल्याने प्रवेशाच्या जागा रिक्त आहेत.