विद्यापीठात महिला कर्मचाऱ्यास मारहाण
By Admin | Updated: July 4, 2014 01:08 IST2014-07-04T01:00:54+5:302014-07-04T01:08:58+5:30
औरंगाबाद : विद्यापीठात शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींवर साक्षांकन करून देण्याच्या मुद्यावरून गुरुवारी विद्यार्थ्याने महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केली.

विद्यापीठात महिला कर्मचाऱ्यास मारहाण
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींवर साक्षांकन करून देण्याच्या मुद्यावरून गुरुवारी विद्यार्थ्याने महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
साक्षांकनासाठी केवळ एकाच खिडकीची सोय असून, तेथे कामाला उशीर होत असल्यामुळे विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यात नेहमी वाद होतो.
विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाचा विद्यार्थी प्रमोद प्रकाशराव धापसे दुपारी २ वाजेच्या सुमारास या एक खिडकी योजनेच्या काऊंटरवर गेला. तेथे त्याने महिला कर्मचाऱ्यास त्याच्याकडील झेरॉक्स प्रतींवर साक्षांकन करून मागितले. त्यांनी त्याच्याकडील प्रतींचा गठ्ठा पाहून एकाच वेळी एवढ्या प्रतींवर साक्षांकन मिळणार नाही, असे सांगितले. धापसे मुख्य प्रवेशदारातून त्या विभागात गेला. त्यावर त्याला एवढ्या संख्येतील प्रतींचे साक्षांकन करणार नसल्याचे महिलेने पुन्हा सांगितले. त्यामुळे प्रमोद आणि त्या महिलेत जोरदार वाद झाला. प्रकरण शिवीगाळ आणि हातघाईपर्यंत गेले. आरडाओरड झाल्यामुळे बैठकीत असलेले कुलसचिव डॉ. डी.आर. माने यांनी स्वत: मध्यस्थी करून भांडण सोडविले. नंतर प्रमोद तेथून निघून गेला आणि दुपारी ४ वाजेच्या सुमारास तो त्या महिला कर्मचाऱ्याविरुद्ध अर्ज घेऊन विद्यापीठ प्रशासन विभागात आला.
तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला प्रकरण मिटलेले असताना पुन्हा कशाला आला, असे विचारताच त्यांच्यात पुन्हा भांडण लागले. महिला कर्मचाऱ्यास विद्यार्थी मारहाण करीत असल्याचे पाहून कर्मचारी संघटनेचे नेते कैलास पाथ्रीकर धावले असता त्यांच्याशीही त्याने अरेरावी करताच अन्य लोकांनी त्याला पकडून चोप दिला.
या प्रकाराची माहिती बेगमपुरा पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी विद्यापीठात जाऊन प्रमोदला ताब्यात घेतले.
पोलीस कारवाईची कुलगुरूंकडे मागणी
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच विद्यापीठातील महिला कर्मचारी जमल्या. त्यांनी या प्रकरणी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना निवेदन दिले आहे. प्रमोद धापसे या विद्यार्थ्याने महिला कर्मचाऱ्याशी अरेरावी करीत त्यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्यामुळे महिला कर्मचारी धास्तावल्या असल्याचे त्यात म्हटले आहे. प्रमोद धापसेविरुद्ध पोलीस कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनावर आर.बी. जगदाळे, एम.बी. आहेर, चांदवडकर, एम.बी. जाधव, एस.टी. लोखंडे यांच्यासह ३० हून अधिक महिला कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी आहे.