औरंगाबाद : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ. विलास जी. गायकर यांनी तडकाफडकी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामे देत असल्याचे त्यांनी म्हटले असले, तरी उच्च शिक्षण विभागाच्या कारभाराला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे.मागील तीन वर्षांपासून सतत मागणी करूनही एकाही पदाला मंजुरी दिली नाही. याच वेळी राज्यातील विविध भागांतील अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांनी बाटूची संलग्नता स्वीकारली. सध्या बाटूकडे १०८ महाविद्यालये संलग्न आहेत. मात्र, या महाविद्यालयांना सुविधा देण्यासाठी आवश्यक असलेले विभागीय केंद्र, उपकेंद्रांची स्थापना केली नाही. एकाही ठिकाणी जागा मिळालेली नाही. यातच कुलसचिव असलेले डॉ. सुनील भांबरे यांची नियुक्ती पेन येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी केली. तेव्हा डॉ. भांबरे यांच्याकडे प्राचार्य आणि कुलसचिवपदाची जबाबदारी ठेवण्याची विनंती कुलगुरू डॉ. गायकर यांनी उच्च शिक्षण विभागाला केली. मात्र, ही विनंती धुडकावून लावण्यात आली. यामुळे निराश झालेल्या कुलगुरूंनी थेट राजीनामाच दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.बाटू विद्यापीठ नवीन असून, विविध पदांना मंजुरी देण्याची घोषणा उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती, परंतु विद्यमान स्थितीत एकही अधिकारी पूर्णवेळ नाही.>मी राजीनामा दिला आहे. माझा कोणावरही आक्षेप नाही. अडचणींचा सामना करीत आतापर्यंत कारभार केला. मात्र, आता शक्य नसल्यामुळे बाजूला होण्याचा निर्णय घेतला.- डॉ. विलास गायकर,कुलगुरू, बाटू
तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 05:51 IST