‘पेट’साठी विद्यापीठ यंत्रणा सज्ज
By Admin | Updated: September 17, 2014 01:15 IST2014-09-17T00:33:45+5:302014-09-17T01:15:14+5:30
औरंगाबाद : पीएच.डी.साठी तिसरी प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) २८ सप्टेंबर रोजी शहरातील १७ केंद्रांवर घेतली जाणार असून, या परीक्षेला ९ हजार २१७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.

‘पेट’साठी विद्यापीठ यंत्रणा सज्ज
औरंगाबाद : पीएच.डी.साठी तिसरी प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) २८ सप्टेंबर रोजी शहरातील १७ केंद्रांवर घेतली जाणार असून, या परीक्षेला ९ हजार २१७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. या परीक्षेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची यंत्रणा सज्ज झाली आहे.
यासंदर्भात ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे यांनी सांगितले की, कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी ‘पेट’ वेळेत घेण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने ५५ विषयांसाठी २८ सप्टेंबर रोजी ‘पेट’ घेण्याचा निश्चय केला. या परीक्षेला ९ हजार २१७ विद्यार्थी बसले आहेत.
शहरातील देवगिरी महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, मौलाना आझाद कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, रफिक झकेरिया महिला महाविद्यालय, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, ‘जेएनईसी’, स.भु. विज्ञान महाविद्यालय, माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालय, इं.भा. पाठक महिला महाविद्यालय, वसंतराव नाईक महाविद्यालय, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, वाय.बी. चव्हाण फार्मसी महाविद्यालय, मिलेनियम इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट, एमआयटी (बी.टेक.) व एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात या १५ केंद्रांवर ही परीक्षा दोन सत्रांत घेतली जाईल. सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत सकाळचे सत्र आणि दुपारी २.३० ते ४.३० वाजेपर्यंत दुपारच्या सत्रात दोन पेपर घेतले
जातील.
या परीक्षेचा निकाल १० दिवसांत जाहीर केला जाईल. विशेष म्हणजे, या परीक्षेतील उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत विद्यार्थ्यांना वितरित करण्याची तरतूद नियमात नाही. त्यामुळे उत्तरांची कार्बन कॉपी त्याच दिवशी परीक्षा संपल्यानंतर वेबसाईटवर टाकली जाईल. ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपण कुठे कमी पडलो, याची सत्यता पडताळता येईल. उद्या १७ सप्टेंबर रोजी परीक्षेचे हॉल तिकीट वेबसाईटवर टाकले जाणार
आहे.