बांधकामे रखडण्यास विद्यापीठ जबाबदार
By Admin | Updated: December 14, 2015 23:58 IST2015-12-14T23:53:02+5:302015-12-14T23:58:01+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील काही इमारतींची बांधकामे रखडण्यामुळे व आता ती नवीन कंत्राटदारांमार्फत करण्याचे घाटत

बांधकामे रखडण्यास विद्यापीठ जबाबदार
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील काही इमारतींची बांधकामे रखडण्यामुळे व आता ती नवीन कंत्राटदारांमार्फत करण्याचे घाटत असल्याने विद्यापीठाला लाखोंचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
विद्यापीठातील काही विभागांची बांधकामे रखडल्याचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यापीठाच्या बांधकाम विभागातील अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यांच्यात चलबिचल झाली. विद्यापीठाच्या बांधकाम समितीची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी सोमवारीच बैठक होती. या बैठकीला कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. या बैठकीतला तपशील मात्र कळू शकला नाही.
दरम्यान, मानसशास्त्र विभागाच्या इमारतीच्या बांधकामाची अधिक माहिती घेतली असता या इमारतीचे काम २०११-१२ मध्ये सुरू झाले आहे. चार वर्षांत ही इमारत पूर्ण होऊ शकली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे साडेचार कोटींची निविदा काढत हे बांधकाम सुरू केले. बांधकाम विभागातील सूत्रांनी माहिती दिल्यानुसार विद्यापीठाच्या कुलसचिवांनी ७ आॅगस्ट २०१५ रोजी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन इमारतीचे बांधकाम थांबविण्याची विनंती केली.
त्यानुसार बांधकाम विभागाने कंत्राटदाराला खंड १५ अंतर्गत नोटीस बजावली. त्यामुळे काम पुढे जाऊ शकले नाही. विद्यापीठाने या इमारतीचे बांधकाम सुरुवातीला गोगाबाबा टेकडीच्या खाली करण्याचे योजले होते. त्यानंतर ते सध्या असलेल्या जागी सुरू करण्यात आले. इमारतीचे बजेट वाढले. दोन कोटी रुपयांपेक्षाही अधिक किमतीचे बांधकाम वाढले. यामुळे हे बांधकाम रखडले आहे. आता हे वाढीव काम विद्यापीठ स्वत: करणार असून ते दुसऱ्या कंत्राटदारामार्फत पूर्ण केले जाण्याचा घाट आहे. मात्र २०११ रोजी काढलेल्या निविदेतील दर आणि नव्याने काढण्यात येणारा दर यामध्ये मोठे अंतर असणार आहे. यामुळे विद्यापीठावर पन्नास लाखांहून अधिक आर्थिक बोजा पडणार आहे.
विद्यार्थ्यांच्या फी आणि इतर मार्गाने जमा होणारा पैसा असा वाया जाणार आहे. बांधकाम विभागाची तांत्रिक माहिती ही कुलगुरू किंवा कुलसचिवांना कळत नाही, त्यामुळे विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून त्यांची दिशाभूल केली जाते. विद्यापीठाच्या बांधकाम समितीवर यापूर्वी असणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनीही बांधकामे मलिदा खाण्याचा मार्ग असल्याचे ओळखून इमारतींच्या प्रगतीसंबंधी हालचाल केली नाही. शिक्षणशास्त्र, विधि आणि डिजिटल स्टुडिओची कामेही रखडली आहेत.