विद्यापीठाचे लॅपटॉप, मोबाईल अधिकाऱ्यांच्या घरी...
By Admin | Updated: July 26, 2016 00:13 IST2016-07-26T00:08:51+5:302016-07-26T00:13:27+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक अधिकाऱ्यांनी पद गेल्यानंतरही त्यांना दिलेले लॅपटॉप आणि मोबाईल हँडसेट जमा न करता घरी नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

विद्यापीठाचे लॅपटॉप, मोबाईल अधिकाऱ्यांच्या घरी...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक अधिकाऱ्यांनी पद गेल्यानंतरही त्यांना दिलेले लॅपटॉप आणि मोबाईल हँडसेट जमा न करता घरी नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या अधिकाऱ्यांमध्ये काही बीसीयूडी संचालक, कुलसचिव, वित्त व लेखाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवृत्त झालेल्या तसेच विद्यापीठाच्या सेवेतून इतरत्र गेलेल्या काही अधिकाऱ्यांनीही विद्यापीठाने दिलेला लॅपटॉप किंवा हँडसेट जमा केलेले नाहीत. गेल्या तीन चार वर्षांत विद्यापीठात कुलसचिव, वित्त व लेखाधिकारी, बीसीयूडी संचालक, परीक्षा नियंत्रक आदी प्रभारींची फौजच निर्माण झाली. नवा अधिकारी आल्यास नवा मोबाईल हँडसेट आणि लॅपटॉप घेण्याची मागणी करतो. त्यानुसार त्या अधिकाऱ्याला त्या वस्तू युनिव्हर्सिटी नेटवर्क अँड इन्फॉर्मेशन सेंटर (युनिक) चे अािण ‘युसीफ’ या विभागाकडून पुरविल्या गेल्या आहेत. सुमारे तीस हजार ते चाळीस हजार रुपयांपर्यंतचा लॅपटॉप आणि वीस हजार ते तीस हजार रुपयांपर्यंतचा मोबाईल हँडसेट विद्यापीठाने अनेक अधिकाऱ्यांना पुरविला आहे. मात्र, या अधिकाऱ्यांनी पद गेल्यानंतरही ते जमा केलेले नाहीत.
प्राप्त माहितीनुसार विद्यापीठातील पद गेलेल्या काही बीसीयूडी संचालक, कुलसचिव आणि वित्त व लेखाधिकाऱ्यांनी लॅपटॉप आणि मोबाईल हँडसेट जमा केलेला नाही. विद्यापीठाची ही संपत्ती या अधिकाऱ्यांनी घरी नेली आहे. काही जणांनी इतर नोकरीच्या निमित्ताने औरंगाबाद शहरही सोडले आहे. त्यामुळे आता विद्यापीठाची ही संपत्ती परत मिळेल की नाही, याबाबत शंकाच आहे.
यासंदर्भात युनिकचे प्रमुख डॉ. सचिन देशमुख यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. मात्र, अनेक अधिकाऱ्यांनी लॅपटॉप व इतर वस्तू जमा केल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विभागप्रमुखही सामील
विद्यापीठातील काही प्राध्यापकांनी विभागाचा प्रमुख म्हणून तसेच विविध संस्थांकडून मिळालेल्या प्रोेजेक्टअंतर्गत लॅपटॉप घेतले आहेत. काहींनी विद्यापीठात संवैधानिक पदावर येताना आणखी एक मोबाईल आणि लॅपटॉप घेतला. त्यामुळे काही प्राध्यापकांकडे विद्यापीठाचे तीन- तीन लॅपटॉप असल्याची माहिती समोर आली आहे. काहींनी ते नंतर आपल्या मुलाबाळांना दिले असल्याचीही माहिती आहे.
अधिकाऱ्यामुळे समोर आली बाब
विद्यापीठातील एक संवैधानिक अधिकारी ३१ जुलै रोजी विद्यापीठाच्या सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यांना विद्यापीठाने दिलेला मोबाईल हँडसेट काही दिवसांपूर्वी हरवला. त्यामुळे निवृत्तीच्या आधी ते सर्व विभागांची ‘एनओसी’ घेत आहेत. हरवलेल्या हँडसेटची रक्कम कोठे जमा करायची किंवा त्याचा दंड कुणाकडे भरायचा यासाठी त्यांनी चौकशी केली. या चौकशीतून वेगळ्याच गोष्टी समोर आल्या. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना दिलेला लॅपटॉप आणि मोबाईल हँडसेटसाठी ‘एनओसी’ घ्यावी लागत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यातून मग काही अधिकाऱ्यांनी विद्यापीठाकडून घेतलेले मोबाईल आणि लॅपटॉप जमा केलेच नसल्याचे समोर आले.