औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागात ३९ व्या एकांकिका महोत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला. नाट्यकर्मी तथा मिलिंद कला महाविद्यालयाच्या निवृत्त प्रा. विजया शिरोळे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रा. सौम्याश्री पवार व नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांची उपस्थिती होती. उद्घाटन समारंभप्रसंगी प्रा. शिरोळे म्हणाल्या की, कलावंतांनी एकांकिकेचे सादरीकरण करताना निरीक्षण क्षमता, कल्पनाशक्ती, एकाग्रता या त्रिसूत्रीचा उपयोग केला पाहिजे. कलावंतांनी प्रकर्षाने हे सूत्र अवलंबिले, तर नक्कीच त्यांच्या अभिनय कौशल्यात वाढ होईल. प्रारंभी, प्रा. सौम्याश्री पवार म्हणाल्या की, नाट्यनिर्मितीच्या वेळी नृत्य कोरिओग्राफीमुळे अभिनयात लवचिकता वाढते. कलावंत व दिग्दर्शकांनी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांनी केले. ते म्हणाले की, नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाच्या दृष्टीने हा एकांकिका महोत्सव आयोजित केला जातो, अशा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते, तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. यातून चांगले नट, दिग्दर्शक, निर्मिती करण्याचे प्रोत्साहन मिळते. सूत्रसंचालन सुनील टाक यांनी केले, तर प्रा. डॉ. जयंत शेवतेकर यांनी आभार मानले. उद्घाटन समारंभानंतर कोमल सोमारे लिखित व दिग्दर्शित ‘नी -धन’, संदीप कणके दिग्दर्शित ‘न घडलेल्या पण लहानशा गोष्टीसाठी’ तसेच रतन सोमारे दिग्दर्शित ‘लपंडाव खऱ्याखोट्यांचा’ या एकांकिका सादर झाल्या. आज दुसऱ्या दिवशी गणेश देवकर दिग्दर्शित ‘आमचं पण नाटक’ व रत्नदीप वाव्हळे दिग्दर्शित ‘आम्ही सगळे’ या एकांकिका सादर झाल्या.
विद्यापीठात एकांकिका महोत्सव सुरू
By admin | Updated: October 15, 2014 00:47 IST