विद्यापीठात करता येईल बारावीनंतर थेट एम. टेक.
By Admin | Updated: July 19, 2014 01:22 IST2014-07-19T01:09:35+5:302014-07-19T01:22:28+5:30
औरंगाबाद : शहराची औद्योगिक पार्श्वभूमी बघता संशोधनाच्या माध्यमातून उद्योजक निर्माण करण्याची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतली आहे.

विद्यापीठात करता येईल बारावीनंतर थेट एम. टेक.
औरंगाबाद : शहराची औद्योगिक पार्श्वभूमी बघता संशोधनाच्या माध्यमातून उद्योजक निर्माण करण्याची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतली आहे. त्याअनुषंगाने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथे माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांची भेट घेऊन या विद्यापीठातील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (निलिट) या संस्थेत १२ वीनंतर थेट एम.एस्सी. व एम. टेक हा संशोधनात्मक अभ्यासक्रम सुरू करण्याविषयी चर्चा केली.
दरम्यान, लवकरच एका तज्ज्ञ समितीमार्फत यासंबंधीचा प्रस्ताव तयार करून तो माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयास सादर केला जाईल. साधारणपणे आगामी शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरू करण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न असतील, असे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी सांगितले. या आठवड्यात दिल्ली येथे देशातील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या (निलिट) औरंगाबाद, चेन्नई, हैदराबाद व बंगळुरू या चार केंद्रांची बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाच्या ‘आयआयटी’चे संचालकही उपस्थित होते. देशभरातील ‘निलिट’पैकी औरंगाबादेतील संस्थेचे कार्य सर्वोत्कृष्ट असल्याचा अभिप्राय कुलगुरू डॉ. चोपडे यांनी व्यक्त केला. डॉ. चोपडे म्हणाले की, औरंगाबादेतील वाढते औद्योगिकरण व संभाव्य डीएमआयसीचे प्रकल्प बघता येथे दर्जेदार कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची गरज आहे. विद्यापीठामार्फत कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण केली जाऊ शकते. त्यासाठी निलिट या संस्थेत सामायिक प्रवेशपूर्व परीक्षेच्या माध्यमातून बारावीनंतर थेट ५ वर्षांची एम.एस्सी., व त्यानंतर १ वर्षाचे एम. टेक. हा संशोधनात्मक अभ्यासक्रम शिकविला जाईल. ५० टक्के संशोधन व ५० टक्के अध्ययन यांचा समन्वय साधून संशोधक निर्माण केले जातील. त्यासाठी विद्यापीठात आवश्यक त्या सोयी- सुविधा आहेत.