विद्यापीठ प्रशासनाने मागितली माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:56 IST2017-09-13T00:56:15+5:302017-09-13T00:56:15+5:30

विद्यापीठाच्या अधिकृत पत्रावर शहराचे चुकीचे नाव लिहिल्यावरून मंगळवारी काँग्रेस पक्षाने धारेवर धरल्यावर विद्यापीठ प्रशासनाने माफी मागितली.

University administration apologizes | विद्यापीठ प्रशासनाने मागितली माफी

विद्यापीठ प्रशासनाने मागितली माफी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अडचणी कमी होण्याचे काही संकेत दिसत नाहीत. एकामागून एक वादविवादात अडकल्यानंतर विद्यापीठाच्या अधिकृत पत्रावर शहराचे चुकीचे नाव लिहिल्यावरून मंगळवारी काँग्रेस पक्षाने धारेवर धरल्यावर विद्यापीठ प्रशासनाने माफी मागितली.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि.११) कुलगुरूंची भेट घेऊन विद्यापीठात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत लवकर कारवाई सुरू करावी, अशी मागणी केली. यावर कुलगुरूंनी लेखी पत्र देऊन प्राधिकरण निवडणुकांनंतर पुतळ्याबाबत ठरावानुसार योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन
दिले.
मात्र, खा. चंद्रकांत खैरे यांच्या नावे दिलेल्या या पत्रावर औरंगाबादऐवजी शहराचा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख केला. चूक लक्षात आल्यावर विद्यापीठाने सुधारित पत्र काढण्याऐवजी तेथे खोडून हाताने औरंगाबाद लिहिले. विद्यापीठासारख्या स्वायत्त शासकीय संस्थेने शहराचे अधिकृत नाव न वापरता चुकीचे नाव वापरावे याविषयी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली.
पक्षाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सकाळी कुलगुरूंची भेट घेऊन या चुकीबाबत खुलासा मागितला. कुलगुरूंच्या दालनात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान कार्यकर्त्यांनी अशी चूक करणाºया संबंधिताला नोकरीवरून बडतर्फ करण्याची मागणी करून विद्यापीठाने जाहीर माफी मागावी, अशी आग्रही भूमिका घेतली. अखेर विद्यापीठाने लेखी पत्राद्वारे याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली.
‘विद्यापीठाच्या पत्रावर पत्ता टाकताना चुकीचा उल्लेख झाला, त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर विद्यापीठ प्रशासन जाहीर दिलगिरी व्यक्त करत आहे’ असे या पत्रात नमूद आहे. यावर कुलसचिवांची स्वाक्षरी आहे. काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळामध्ये शहराध्यक्ष नामदेव पवार, खालेद पठाण, बाबा तायडे,अनिल माळोदे, मोईन कुरेशी, इद्रिस नवाब, सुभाष देवकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते होते.
मराठा क्रांती मोर्चाचा शुक्रवारी आंदोलनाचा इशारा
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम त्वरित सुरू करावे आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. संजय शिंदे यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी कुलगुरूंना करण्यात
आली.
दोन वर्षांपूर्वी ठराव पारित होऊन आर्थिक तरतूद करूनही केवळ काही संघटनांच्या दबावापोटी पुतळ्याचे काम सुरू झालेले नाही. तसेच संजय शिंदे यांची चौकशी न करता त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. हे अधिकाराचे उल्लंघन असून निलंबन तात्काळ रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली.
यावर कुलगुरूंनी एक समिती स्थापन करून आठ दिवसांत या प्रकरणावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, शुक्रवारपर्यंत (दि.१५) दोन्ही मागण्या पूर्ण झाल्या नाही तर संपूर्ण मराठवाड्यातील समाज विद्यापीठात जोरदार आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात
आला.

Web Title: University administration apologizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.