प्रशासनाची अनोखी शक्कल आणि तासाभरात रस्ते सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:04 IST2021-04-09T04:04:31+5:302021-04-09T04:04:31+5:30

सिल्लोड : कडक निर्बंध लागू करूनही नागरिक ऐकण्यास तयार नाहीत. नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी ...

Unique shackles of administration and smooth roads in an hour | प्रशासनाची अनोखी शक्कल आणि तासाभरात रस्ते सामसूम

प्रशासनाची अनोखी शक्कल आणि तासाभरात रस्ते सामसूम

सिल्लोड : कडक निर्बंध लागू करूनही नागरिक ऐकण्यास तयार नाहीत. नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी सिल्लोड प्रशासनाने एक नामी शक्कल लढविली. आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, महसूल विभाग व नगरपरिषदेने एकत्रितपणे अभियान राबवून विविध चौकात टेबल मांडले व रस्त्यावर फिरणाऱ्यांना पकडून कोरोना चाचणी करणे सुरू केले. पकडून चाचण्या करण्यात येत असल्याची वार्ता काही तत्काळ शहरभर पसरली, यामुळे रस्त्यावर अचानक धावपळ सुरू झाली. आणि तासाभरातच रस्ते एकदम निर्मनुष्य झाले. कोरोना चाचणीच्या भीतीपोटी नागरिकांनी दिवसभर घराबाहेर पडणे टाळले.

सिल्लोड शहरात लॉकडाऊन असूनही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत होते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी नगरपालिका, आरोग्य विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांनी एकत्र येत रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचे ठरविले. त्यानुसार गुरुवारी विविध चौकात टेबल लावण्यात आले. रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पकडून त्याची ॲंटिजेन चाचणी केली जाऊ लागली. यामुळे सर्व शहरात एकच धावपळ उडाली. केवळ तासाभरातच रस्त्यावर सगळीकडे सामसूम दिसून आले. कोरोना चाचणीच्या भीतीने नंतर दिवसभर नागरिक रस्त्यावर फिरकलेच नाही. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार संजय सोनवणे, किरण कुलकर्णी, विनोद करमनकर, आशिष औटी, मुख्याधिकारी सैय्यद रफिक, प्रकल्प अधिकारी देवेंद्र सूर्यवंशी, उपमुख्याधिकारी ए.एम. पठाण, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, सपोनि. नालंदा लांडगे आदींनी परिश्रम घेतले.

चौकट....

अनेकांनी धरले पाय

आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचारी रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या दुचाकी, सायकल व पायी फिरणाऱ्या लोकांना पकडून आणत होते. आपली कोरोना चाचणी करणार या भीतीने अनेकजण कर्मचाऱ्यांच्या हाता पाया पडून टेस्ट करू नका, मी पुन्हा रस्त्यावर फिरणार नाही. असे म्हणत आर्जव करीत होते. यामुळे काहींना समज देऊन सोडण्यात आले. यावेळी विविध चौकात चाळीस जणांची चाचणी करण्यात आली.

कोट....

नियमांचे पालन करा

नागरिकांना वारंवार आवाहन करूनही ऐकत नाहीत. विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. कोरोनाला रोखायचे असेल तर प्रशासनाने दिलेेल्या नियमांचे पालन करावे.

- संजय सोनवणे, नायब तहसीलदार, सिल्लोड

फोटो कॅप्शन : सिल्लोड शहरात अचानक प्रियदर्शनी चौकात अँटिजन टेस्टसाठी सावजाची प्रतीक्षा करताना आरोग्य पथक, पोलीस, महसूल अधिकारी दिसत आहे. २)तर कोरोनाची टेस्ट होत असल्याचे बघून सामसूम झालेले रस्ते.

Web Title: Unique shackles of administration and smooth roads in an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.