गणवेश योजना गुगलवर
By Admin | Updated: June 26, 2017 23:39 IST2017-06-26T23:38:57+5:302017-06-26T23:39:55+5:30
हिंगोली : शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाची माहिती आता मुख्याध्यापकांना गुगलफॉर्मवर आॅनलाईन प्रद्धतीने भरून द्यावी लागणार आहे.

गणवेश योजना गुगलवर
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाची माहिती आता मुख्याध्यापकांना गुगलफॉर्मवर आॅनलाईन प्रद्धतीने भरून द्यावी लागणार आहे. सर्व शिक्षा अभियानच्या संबंधित संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांच्या गणवेशाची व इतर शालेय माहिती भरून सदर अहवाल मुंबई येथे सादर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात जवळपास एकूण ७० हजारांच्या वर मुला-मुलींना मोफत गणवेश वाटप करायचे आहेत.
यावर्षीपासून आता गणवेशासाठी लागलेला खर्च विद्यार्थी - पालक यांच्या जार्इंट बँक खात्यावर जमा केला जाणार आहे. परंतु शासनाकडून निधीच उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळाले नाहीत. त्यानंतर शिक्षण विभागाने उर्वरित रकमेतून गणवेश खरेदीच्या सूचना दिल्या होत्या. परंतु नेमका कुठल्या शिल्लक रक्कमेतून खर्च करायचा आहे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले नव्हते. त्यामुळे अनेक मुख्याध्यापकांची कोंडी झाली होती. काही विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे. परंतु अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळाले नाहीत.
विशेष म्हणजे, आतापर्यंत किती शाळांनी शिक्षण विभागाच्या शिल्लक रक्कमेतून गणवेश खरेदी केले आहेत. याबाबत गुगलफार्मवर माहिती भरून देण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. शिवाय यासंदर्भात सर्व शिक्षा अभियानकडून संबंधित गशिअ व मुख्याध्यापकांना कळविले. मात्र केवळ मोजक्याच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले आहेत.
ज्यांनी पात्र विद्यार्थ्यांची माहिती गुगलफॉर्मवर भरली नाही, त्यांना रक्कम मिळणार नाही. असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. अनेक शाळांत तर इतर योजनांतील निधीच शिल्लक नाही. त्यामुळे अशा शाळांत तर गणवेश कुणाला मिळालाच नाही. मात्र या नव्या फंड्यामुळे पुन्हा गणवेश खरेदी प्रक्रिया लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.