मराठवाड्यात वाघाने दिली वर्दी; दोन बछड्यांसह वाघीणीने घेतली ज्वारीच्या शेतात निद्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 01:57 PM2021-02-19T13:57:16+5:302021-02-19T13:59:54+5:30

Tiger In Aurangabad District सोयगाव तालुक्यातील घोसला शिवाराला लागूनच असलेल्या डोंगररांगांतून सदर वाघीण बछड्यांसह शेतशिवारात आल्याचे बोलले जात आहे.

Uniform given by tiger in Marathwada; Tiger with two calves slept in a sorghum field | मराठवाड्यात वाघाने दिली वर्दी; दोन बछड्यांसह वाघीणीने घेतली ज्वारीच्या शेतात निद्रा

मराठवाड्यात वाघाने दिली वर्दी; दोन बछड्यांसह वाघीणीने घेतली ज्वारीच्या शेतात निद्रा

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्याने मोबाइलद्वारे घेतले छायाचित्र; याबाबत वनविभाग अंधारात

- ज्ञानेश्वर वाघ

घोसला : मराठवाडा विभागातील जंगलात वाघ नाहीत, वर्षभरापूर्वी केवळ एक वाघ विदर्भातून फिरत आल्याची घटना घडली होती. मात्र, गुरुवारी पहाटेच्या सुमारास सोयगाव तालुक्यातील घोसला शिवारात एक वाघीण आपल्या दोन बछड्यांसह दिसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला असून, आपल्या मोबाइलमध्ये तिचे छायाचित्रही टिपले आहे. या छायाचित्रातील आकार व पट्ट्यांमुळे ती मादी बिबट्या नसून वाघीण असल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली. ग्रामस्थ गुरुवारी दिवसभर भीतीच्या सावटाखाली होते.

घोसला शिवाराला लागूनच असलेल्या डोंगररांगांतून सदर वाघीण बछड्यांसह शेतशिवारात आल्याचे बोलले जात आहे. गट क्र. १०८ जवळील शेतात शेतकरी सुपडू पटेल यांना एका रोहीची शिकार केल्याचे आढळून आले. तीन ते चार दिवसांपूर्वी ही शिकार केली असावी, असा अंदाज आहे. गुरुवारी पहाटे ६ वाजता शेतावर जाणाऱ्या प्रकाश एकनाथ गव्हांडे यांनी वाघिणीला बछड्यांसह प्रत्यक्ष एका ज्वारीच्या शेताकडे जाताना पाहिले. यामुळे त्यांची भीतीने गाळण उडाली. यावेळी बॅटरीच्या प्रकाशझोतात त्यांनी त्यांचे माेबाइलद्वारे छायाचित्र घेतले व तेथून गावाकडे धूम ठोकली. 

ही वाघीण बापू वाघ यांच्या ज्वारीच्या शेतात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बापू वाघ यांनी खळ्यावरील एका खोलीत टेपरेकॉर्डर मोठ्याने वाजवून आरोळ्या ठोकल्या. या आवाजानंतर सदर वाघिणीने डरकाळी फोडल्यानंतर बापू वाघ हे दुचाकी घेऊन घराकडे पळाले. यानंतर वाघिणीने या ज्वारीच्या शेतात बछड्यांसह गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत निद्रा घेतल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत वनविभागाशी संपर्क केला असता, वनपाल अनिल पाटील यांचा मोबाइल बंद येत होता, तर वनपरिक्षेत्र अधिकारी हे बैठकीसाठी गेले होते. त्यामुळे या घटनेबाबत वनविभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शेतकरी शेतात जाणे टाळत आहेत.

डरकाळी फोडल्यानंतर तेथून निघालो
ज्वारीच्या शेतात वाघीण बछड्यांसह आल्याची माहिती मिळाली. शेतावर जाऊन मी टेपरेकॉर्डर मोठ्याने वाजवून आरोळ्या ठोकल्या. मात्र, वाघिणीने डरकाळी फोडल्यानंतर मी तेथून घराकडे आलो.
-बापू वाघ, शेतकरी, घोसला

जवळूनच बछड्यांसह वाघीण दिसली
पहाटे ६ वाजता शेतावर जात असतानाच अचानक रस्त्यावर जवळूनच बछड्यांसह वाघीण जाताना दिसली. बॅटरीच्या प्रकाश झोतात ते थोडे चलबिचल झाले व शेजारच्या शेतात गेले. मी मोबाइलमध्ये त्यांचे छायाचित्र टिपले. याबाबत मी तात्काळ ग्रामस्थांना माहिती दिली.
-प्रकाश एकनाथ गव्हांडे, शेतकरी, घोसला

Web Title: Uniform given by tiger in Marathwada; Tiger with two calves slept in a sorghum field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.