भाडे न भरताच बिनदिक्कतपणे पालिका इमारतींचा वापर
By Admin | Updated: May 26, 2017 00:40 IST2017-05-26T00:37:46+5:302017-05-26T00:40:43+5:30
अंबड : नगरपालिकेच्या मालकीच्या एकुण किती इमारती शहरात आहेत याची ठोस माहिती पालिका प्रशासनाकडेच नाही.

भाडे न भरताच बिनदिक्कतपणे पालिका इमारतींचा वापर
रवी गात ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : नगरपालिकेच्या मालकीच्या एकुण किती इमारती शहरात आहेत याची ठोस माहिती पालिका प्रशासनाकडेच नाही. पालिकेच्या मालकीच्या इमारतींमध्ये दोन बँक व चार शैक्षणिक संस्था आहेत, धक्कादायक बाब म्हणजे यापैकी काहींचा पालिकेशी कोणताही करार झालेला नाही तसेच काही संस्थांनी अनेक वर्षांपासून भाडेच भरलेले नाही तरीही या संस्था पालिकेच्या मालकीच्या इमारती वापरत असल्याचे उघडकीस येत आहे.
पालिकेच्या मालकीच्या इमारतींमध्ये स्टेट बँक आॅफ हैद्राबाद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या दोन बँक तसेच कै.दत्ताजी भाले विद्यालय, गोदावरी प्राथमिक विद्यालय, मत्स्योदरी विद्यालय व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय अशा चार शैक्षणिक संस्था आहेत. यापैकी काहींनी भाडे करार केलेला आहे तर काहींनी केवळ भाडेकराराचा फार्स करुन इमारती ताब्यात घेतल्या आहेत. विशेष म्हणजे यापैकी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी आवश्यक वातावरण व परिस्थितीच नाही, तरीही याठिकाणी शाळा चालविल्या जात आहेत. विशेष म्हणजे शहरातील युवकांनी विविध क्रीडाप्रकारांकडे आकर्षित व्हावे या उद्देशाने पालिकेने तयार केलेल्या क्रीडा संकुलात खाजगी शाळा आहे, या संस्थेचे नाव एका अत्यंत शिस्तबध्द, नीतीमत्ता जपणाऱ्या व तत्वांशी कोणत्याही बाबतीत तडजोड न करणाऱ्या संघटनेशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.
क्रीडा संकुलात खेळाडुंना कपडे बदलण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लहान-लहान खोल्यांमध्ये वर्ग भरविणे कोणत्या नीतीमत्तेत बसते. काही वर्षांपासून पालिकेचे भाडे भरणेच बंद केले आहे. पालिकेच्या मालकीच्या या क्रीडागंणाच्या इमारतीमध्ये शाळेने नवीन बांधकाम सुरू केले आहे. या शाळेकडे पालिकेचे तब्बल ५ लाख ५२ हजार रुपये थकीत आहेत. (समाप्त)