नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडविणारा अटकेत
By Admin | Updated: July 24, 2014 00:40 IST2014-07-24T00:31:50+5:302014-07-24T00:40:09+5:30
औरंगाबाद : हमखास नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या इगतपुरीतील व्यावसायिक महासंघ या संस्थेच्या संचालकाला तरुणांनी पकडून मंगळवारी बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले.

नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडविणारा अटकेत
औरंगाबाद : शासकीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्था असून, हमखास नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या इगतपुरीतील व्यावसायिक महासंघ या संस्थेच्या संचालकाला तरुणांनी पकडून मंगळवारी बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले.
विनायक रामभाऊ भुसारे पाटील (रा. सहकार ट्रस्ट,सर्वोदयनगर, मुंबई) असे या संचालकाचे नाव आहे. त्याच्याबरोबरच संस्थेची सचिव चारुशीला जोशी, व्यवस्थापक प्रवीण तेलुरे व सुनीता पाटील यांच्यावरही बेगमपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपी विनायक भुसारे व त्याचे साथीदार ‘व्यावसायिक महासंघ’ नावाची व्यावसायिक प्रशिक्षण संस्था चालवितात. या संस्थेचे नाशिक जिल्ह्यात इगतपुरी येथे कार्यालय आहे. ‘आमची संस्था शासकीय आहे, संस्थेचे सभासद व्हा आणि हमखास नोकरी मिळवा’ अशा जाहिराती ते करीत होते. संस्थेच्या नोंदणी आणि मुलाखतीसाठी विविध शहरांमध्ये ते बेरोजगारांच्या मुलाखती आयोजित करीत.
मंगळवारी भुसारेने औरंगाबादेतील सुभेदारी विश्रामगृहावर मुलाखती ठेवल्या. नोकरीच्या आशेने शेकडे बेरोजगार आले. तेव्हा नोंदणीसाठी त्याने प्रत्येकाकडून अडीचशे रुपये घेतले. त्याच्या पावत्याही दिल्या. त्या पावत्या पाहून ही संस्थाच बोगस असल्याचा काही तरुणांना संशय आला. त्यामुळे तरुणांनी त्याला धारेवर धरले. संस्था शासकीय कशी, अशी विचारणा केली. तेव्हा तो गडबडला. त्यावरून हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे तरुणांच्या लक्षात आले. मग तरुणांनी भुसारेला पकडले आणि बेगमपुरा पोलीस ठाण्यात आणले. तेव्हा हा फसवणुकीचाच प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. पैसे भरणाऱ्यांपैकी तुषार डकले (रा. पुंडलिकनगर) या तरुणाने भुसारे व त्याच्या साथीदारांविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. फौजदार सुभाष हिवराळे हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
राजमुद्रेचा वापर
आरोपी भुसारे याने आपल्या संस्थेच्या माहिती पुस्तकावर शासकीय अधिकारी व मंत्र्यांची नावे वापरलेली आढळून आली. शिवाय त्याच्या व्हिजिटिंग कार्डवरही शासकीय राजमुद्रा व अशोक स्तंभ छापलेला आहे, हे विशेष.