बीड बायपास सर्व्हिस रोडचे काम हाती घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:16 IST2021-02-05T04:16:35+5:302021-02-05T04:16:35+5:30
औरंगाबाद: बीड बायपास रोडवर होणाऱ्या सततच्या अपघातांना आळा घालण्यासाठी सर्व्हिस रोडचे काम शासनाने हाती घेऊन निष्पाप लोकांचे जीव वाचवावेत, ...

बीड बायपास सर्व्हिस रोडचे काम हाती घ्या
औरंगाबाद: बीड बायपास रोडवर होणाऱ्या सततच्या अपघातांना आळा घालण्यासाठी सर्व्हिस रोडचे काम शासनाने हाती घेऊन निष्पाप लोकांचे जीव वाचवावेत, अशी मागणी महिलांच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली.
जिजाऊ ब्रिगेड औरंगाबाद तसेच सातारा देवळाई जनसेवा महिला समितीने बीड बायपासवरील मृत्यूबाबत चिंता व्यक्त केली. जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष ॲड. वैशाली कडू, संगीता भुजंग, स्मिता पठारे, सुचिता कुलकर्णी, शुभांगी लातूरकर आदी महिलांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि आमदार अंबादास दानवे यांच्याकडे मागणीचे निवेदन देऊन तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.
बीड बायपास रोडवर एका आठवड्यात ३ अपघात होऊन त्यामध्ये ४ जणांचा बळी गेला आहे. या सर्व घटना दोन ते तीन किलोमीटर अंतरातच झालेल्या आहेत. बीड बायपास रोडवर गेल्या तीन वर्षांत अनेक निष्पाप लोक मृत्युमुखी पडले. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. सातारा देवळाई येथील रहिवासी गेल्या पाच वर्षांपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड व्हावा यासाठी आंदोलने करत आहेत. आता लोकांचा संयम संपलेला आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
कॅप्शन....बीड बायपासवर सर्व्हिस रोडचा प्रश्न मार्गी लावावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे निवेदन सादर करताना जिजाऊ ब्रिगेड औरंगाबाद आणि सातारा देवळाई जनसेवा महिला समितीच्या सदस्य.