दुराव्यानंतर मूकबधिर दाम्पत्याचा समजूतदारपणा; समुपदेशन करताच संसाराची गाडी पुन्हा धावू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 13:23 IST2021-02-26T13:21:51+5:302021-02-26T13:23:23+5:30
लॉकडाऊनमुळे रोजगार नव्हता त्यामुळे आर्थिक चणचण निर्माण झाली

दुराव्यानंतर मूकबधिर दाम्पत्याचा समजूतदारपणा; समुपदेशन करताच संसाराची गाडी पुन्हा धावू लागली
- बापू सोळुंके
औरंगाबाद : ते दोघे पती-पत्नी मूकबधिर. काही कारणामुळे भांडण होऊन दुरावा निर्माण झाला. हा दुरावा कमी करण्यासाठी पोलिसांनी त्यांचीच भाषा समजणाऱ्या एका शिक्षक मध्यस्थाला बोलावले. त्यांच्याच भाषेत त्यांचे समुपदेशन केल्यावर पती त्याची चूक मान्य करीत पत्नीला नांदवण्यास तयार झाला. तिनेही आपली चूक मान्य केली आणि दोघांच्या समजूतदारपणामुळे त्यांच्या संसाराची गाडी पुन्हा धावू लागली.
चितेगाव येथील रहिवासी सीमा (नाव बदलले) आणि आसेफिया कॉलनीतील समीर (नाव बदलले आहे) हे दोघेही जन्मापासून मूकबधिर. समीर पेंटरचे काम करतो तर ती गृहिणी आहे. चार वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. गतवर्षी लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने समीरची आर्थिक परिस्थिती ढासळली. याच काळात पत्नी गर्भवती असतानाही तो तिला दवाखान्यात नेऊ शकला नव्हता. यावरून त्यांच्यात शाब्दिक भांडणेही झाली. यातून त्याने तिला माहेरी नेऊन सोडले. त्याने नंतर तिची विचारपूसही केली नाही. दरम्यानच्या काळात तिने बाळाला जन्म दिला. बाळ जन्मल्यानंतरही पतीने विचारणा केली नसल्याचा राग धरून तिने आईला सोबत घेऊन पोलिसांच्या भरोसा सेलकडे पतीविरुध्द तक्रार अर्ज दिला.
पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी तक्रारदार सीमा आणि तिच्या पतीला समोरासमोर बोलावले तेव्हा दोघेही मूकबधिर असल्यामुळे त्यांच्या वतीने त्यांच्या आई गाऱ्हाणे मांडत होत्या. मूकबधिरांची भाषा येत नसल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे पोलीस निरीक्षक पाटील यांना कठीण झाले. महिला तक्रार निवारण मंचकडे अशा जोडप्याची ही पहिलीच तक्रार असल्यामुळे काय करावे, असा प्रश्न पाटील आणि समुपदेशक मंगला खिवंसरा यांना पडला. शेवटी त्यांनी हवालदार सय्यद यासीन यांच्या मदतीने मूकबधिर शाळेतील शिक्षक प्रशांत ढवळे यांची मदत घेतली. ढवळे यांनी पोलिसांसमोर त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत या जोडप्याशी संवाद साधला.
केवळ आर्थिक परिस्थितीमुळे हतबल झाल्याने समीर पत्नी आणि बाळाची काळजी घेऊ शकला नाही, हे त्याने सांगितले. एवढेच नव्हे तर पैशांची चणचण असताना तिच्याकडून दवाखान्यात नेण्यासाठी होत असलेल्या तगाद्यामुळे तो सीमावर अनेकदा रागावला होता. हे त्याने मान्य करीत तिची माफी मागितली. सीमाने सासू आणि सासरच्या अन्य नातेवाईकांविषयी तक्रार नाही, असे सांगितले. समीरने तिला नांदविण्यासाठी सोबत नेण्याची तयारी दर्शविली आणि मूकबधिर जोडप्यासह उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांचे चेहरे आनंदले.
समजूतदारपणामुळे शक्य झाले
भरोसा सेलकडे पती - पत्नीच्या दरमहा शेकडो तक्रारी प्राप्त होतात. यातील अनेक तक्रारी खोट्याही असतात. मूकबधिर सीमाची तक्रार अत्यंत साधी आणि केवळ पतीविरूध्द होती. हे जोडपे अत्यंत समजूतदार दिसले. पतीने त्याची चूक मान्य करीत पत्नीला नांदविण्यास नेले. या जोडप्याचे समुदेशन करणे आमच्यासाठी कठीण होते. मात्र, त्यांच्यातील समजूतदारपणामुळे ते सोपे झाले.
- किरण पाटील, पोलीस निरीक्षक, भरोसा सेल.