वरिष्ठांना डावलून आंधळेंना पदभार
By Admin | Updated: August 15, 2014 01:36 IST2014-08-15T01:24:03+5:302014-08-15T01:36:20+5:30
बीड : वर्ग एकचा अधिकारी उपलब्ध असूनही वर्ग २ च्या अधिकाऱ्यास जिल्हा आरोग्य अधिकारीपदाच्या खुर्चीत बसविल्याचा प्रकार जिल्हा परिषदेत घडला आहे़

वरिष्ठांना डावलून आंधळेंना पदभार
बीड : वर्ग एकचा अधिकारी उपलब्ध असूनही वर्ग २ च्या अधिकाऱ्यास जिल्हा आरोग्य अधिकारीपदाच्या खुर्चीत बसविल्याचा प्रकार जिल्हा परिषदेत घडला आहे़ गुरुवारी वैद्यकीय अधिकारी डॉ़ कमलाकर आंधळे यांनी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली़
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ गोवर्धन डोईफोडे यांना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच हजारांची लाच स्वीकरताना पकडले होते़ त्यांची कोठडीत रवानगी झाली असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई अटळ आहे़ दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी पदाच्या रिक्त जागेवर जिल्हा प्रजनन व बालआरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांचा पहिला हक्क होता; पण त्यांना बाजूला सारुन डॉ़ कमलाकर आंधळे यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविला आहे़ डॉ़ आंधळे यांचे शिक्षण एमबीबीएस आहे तर डॉ़ वडगावे हे एमबीबीएस एमडी आहेत़ याशिवाय डॉ़ वडगावे हे वर्ग एकचे अधिकारी असून त्यांची निवड एमपीएससीमार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गात झालेली आहे़ उल्लेखनीय म्हणजे जिल्हा प्रजनन व बालआरोग्य अधिकारी हे पद जिल्हा आरोग्य अधिकारी पदाच्या समकक्ष आहे़ मात्र, डॉ़ वडगावे यांना डावलून डॉ़ आंधळेंना जिल्हा आरोग्य अधिकारीपदी बसविण्यामागे कुठला ‘अर्थ’ दडला आहे? याचे कोडे उलगडायला तयार नाही़ दरम्यान, डॉ़ वडगावे यांच्याकडे डीएचओ पदाचा पदभार देण्यासंदर्भातल संचिका सामान्य प्रशासनाकडे गेली होती मात्र त्यानंतर डॉ़ वडगावे यांच्याऐवजी डॉ़ आंधळे यांच्याकडे डीएचओ पद सोपविण्यात आले़
डॉ़ आंधळे यांची मूळ नियुक्ती जिल्हा प्रशिक्षण संघाच्या वैद्यकीय अधिकारी पदावर आहे़ त्यांच्याकडे जिल्हा क्षयरोगअधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार आहे़ आता जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा प्रभारी कारभार त्यांच्याचकडे देण्यात आला आहे़
यासंदर्भात आरोग्य उपसंचालक डॉ. सुनील पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी नंतर बोलतो असा मेसेज पाठवून प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.
प्रतिमा सुधारणार
डॉ़ कमलाकर आंधळे यांनी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सांगितले की, आरोग्य विभागाची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे़ वैद्यकीय अधिकारी चोवीस तास प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध रहावेत़ कोणीही सेवांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल़ यापूर्वी एक वर्ष आपण जिल्हा आरोग्य अधिकारीपदाचा प्रभारी कारभार सांभाळलेला आहे़ त्यामुळे अनुभव पाठिशी आहे, असेही ते म्हणाले़ (प्रतिनिधी)