दलित कुटुंबावर समाजाचा अघोषित बहिष्कार

By Admin | Updated: January 23, 2015 00:54 IST2015-01-23T00:26:34+5:302015-01-23T00:54:51+5:30

जालना : शहरापासून ८ कि़मी. अंतरावर असलेल्या राममूर्ती गावात दलित समाजातीलच एका कुटुंबावर या समाजातील अन्य कुटुंबियांनी गेल्या अनेक दिवसांपासून अघोषित बहिष्कार टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Undeclared boycott of community on Dalit family | दलित कुटुंबावर समाजाचा अघोषित बहिष्कार

दलित कुटुंबावर समाजाचा अघोषित बहिष्कार


जालना : शहरापासून ८ कि़मी. अंतरावर असलेल्या राममूर्ती गावात दलित समाजातीलच एका कुटुंबावर या समाजातील अन्य कुटुंबियांनी गेल्या अनेक दिवसांपासून अघोषित बहिष्कार टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातून पाच दिवसांपुर्वी कुटुंबप्रमुखावर हल्ला झाला असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
२०११ च्या जगनणनेनुसार तीन हजार लोकसंख्या असलेले हे गाव. शहरालगतच असल्याने या गावातील बहुसंख्य तरूण मजुरीच्या कामासाठी जालन्यात येतात. गावात मराठा, बौद्ध, धनगर या समाजबांधवांबरोबरच मुस्लिम बांधवही मोठ्या संख्येने राहतात. मागील पंधरा दिवसांपूर्वीच गावास महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाचा पुरस्कारही मिळालेला आहे.
१७ जानेवारी रोजी रामभाऊ काळुबा मगर (५०) यांच्या छातीवर चाकूहल्ला व काठीने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नालीचे पाणी अंगावर फेकण्याच्या कारणावरून हा हल्ला झाल्याचे रामभाऊ मगर यांनी फिर्यादीत नमूद केलेले आहे. दलित समाजातील अन्य मंडळींनी मात्र ही तक्रार खोटी असल्याचे म्हटले आहे. हे प्रकरण जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ टीमने गुरुवारी हे गाव गाठले.
रामभाऊ यांचे सुपुत्र श्रीमंत मगर म्हणाले की, आम्ही एका कुटुंबाकडून जागा खरेदी केलेली आहे. आमच्या घरालगतच समाजमंदिर आहे. समाजमंदिराच्या साफसफाईला, रंगरंगोटीला अडचण होते म्हणून आम्ही काही जणांच्या सांगण्यावरून थोडीफार जागाही सोडली. परंतु आणखी जागा सोडावी, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही जागा सोडून जावे, यासाठी काही लोकांनी कटकारस्थान करून काही वर्षांपूर्वी आमचे घर पाडले होते. आमच्या समाजातील एक, दोन लोकांनीच अन्य लोकांची दिशाभूल केली, त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून समाजातील लोक आम्हाला बोलत नाहीत. कुठल्याही कार्यक्रमात आम्हाला सहभागी करून घेतले जात नाही. रिक्षाने किंवा अन्य वाहनाने गावातून बाहेर जायचे झाल्यास आम्ही वाहनात बसल्यानंतर इतर लोक उतरतात. किंवा आम्ही बसणार, त्या वाहनात कुणीच बसत नाही. आमच्या कुटुंबातील व्यक्तींशी बोलू नये, बोलल्यास ५०० रुपयांचा दंड वसूल करण्याचाही इशारा देण्यात आलेला आहे. या हल्ल्यानंतर जालन्यात सुधाकर रत्नपारखे, बबन रत्नपारखे यांनी आम्हाला मदत केली, असे ते म्हणाले. हा वाद नालीतील पाणी फेकण्याच्या कारणावरून असला तरी तो नव्याने झालेला नाही. काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रामभाऊ यांच्याशी गेल्या सहा-सात वर्षांपासून समाजातील काही कुटुंबियांशी जागेवरुन वाद सुरू आहे. समाजमंदिरालगत रामभाऊ यांची ९०० स्क्वेअर फूट जागा आहे. या घरासमोर असलेल्या गटारीचा त्रास, तर कधी समाजमंदिराची रंगरंगोटी किंवा साफसफाई करताना घराच्या जागेचा त्रास होतो म्हणून वाद निर्माण झाले. साफसफाईसाठी ग्रामसभेत रामभाऊ यांनी त्यांच्या घराचा काही भाग मोकळा सोडावा, असा प्रस्ताव मांडला होता. गावातील काही ज्येष्ठमंडळींनी या मुद्यावरून वाद नको म्हणून चार, पाच फूट जागा सोडण्याची मागणी रामभाऊ यांनी मान्यही केली होती. तरीही वाद मिटला नाही.४
सरपंच कैलास गिराम म्हणाले, रामभाऊ आणि त्यांच्या समाजातील काही मंडळी यांच्यात अनेक दिवसांपासून अंतर्गत वाद आहे. या वादामुळे ही मंडळी त्यांच्याशी किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींशी बोलत नाही. परंतु रामभाऊ यांच्या कुटुंबियांवर बहिष्कार वगैरे असे काही नाही, असेही गिराम यांनी सांगितले.४
विकास मगर म्हणाले, रामभाऊ हेच नेहमी वाद घालतात. त्यांच्या कुटुंबियांवर बहिष्कार नाही, परंतु त्यांच्या अशा स्वभावामुळे कोणी बोलत नाही. खोट्या केसेस त्यांनी यापूर्वी देखील केलेल्या असल्याचा दावा विकास मगर यांनी केला.
ज्येष्ठ नागरिक आसाराम मगर म्हणाले, रामभाऊ यांनी पोलिसांत खोटी तक्रार दिली आहे. ज्यांच्याविरुद्ध तक्रार दिली, त्यांचे समाजातील स्थान चांगले आहे. कोणत्याही भांडणात, वादात ते पडत नाहीत. सकाळी शहरात कामासाठी जायचे आणि सायंकाळी यायचे, असेच त्यांचे काम. नेहमी वाद करण्याचा रामभाऊ यांचा स्वभाव असल्याने त्यांच्याशी कोणी बोलत नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: Undeclared boycott of community on Dalit family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.