फावडे डोक्यात मारून पुतण्याने केला काकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:26 IST2020-12-17T04:26:15+5:302020-12-17T04:26:15+5:30
दौलताबाद : शेतात पाणी भरण्याच्या आळीपाळीवरून काका पुतण्यात भांडण झाले. हे भांडण एवढे विकोपाला गेले की, पुतण्याने आपल्या काकाच्या ...

फावडे डोक्यात मारून पुतण्याने केला काकाचा खून
दौलताबाद : शेतात पाणी भरण्याच्या आळीपाळीवरून काका पुतण्यात भांडण झाले. हे भांडण एवढे विकोपाला गेले की, पुतण्याने आपल्या काकाच्या डोक्यात फावडे मारून त्यांचा खून केला. ही घटना आसेगाव शिवारातील (ता. गंगापूर) गट क्रमांक बारामध्ये घडली. सुभाष त्रिंबक काळे (५५) असे मृत व्यक्तीचे नाव असून ज्ञानेश्वर कुशिनाथ काळे (३०) असे आरोपीचे नाव आहे.
सध्या रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची घाई सुरू आहे. त्यात विजेचा लपंडाव सुरू असतोच. त्यामुळे गावागावात विजेच्या बदलत्या शेड्युल्डप्रमाणे शेताला पाणी दिले जाते. त्यातच पाण्यात वाटेकरी असेल तर तिथे नेहमीच कुरकुरी असतात. असाच काहीसा प्रकार गंगापूर तालुक्यातील आसेगाव शिवारात काका पुतण्यात घडला. काका सुभाष त्रिंबक काळे व पुतण्या ज्ञानेश्वर कुशिनाथ काळे या दोघांमध्ये शनिवारी दुपारी विहिरीतील पाणी घेण्यावरून वाद झाला. या भांडणाचे रुपांतर पुढे हाणामारीवर आले. आणि पुतण्या ज्ञानेश्वर काळे याने काका सुभाष काळे यांच्या डोक्यात फावड्याने वार केला. आणि सुभाष काळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. हा प्रकार घडल्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर याने स्वत: दौलताबाद पोलीस स्टेशन गाठले. घडलेली घटना पोलिसांना सांगितली.
तत्काळ पोलीस निरीक्षक राजश्री आड़े, उपनिरीक्षक रवी कदम, पोलीस अंमलदार पी. डी. पचलोरे. डी.बी. त़डवी, रफीक पठान, शर बच्छाव, निलेश पाटील, पोलीस पाटील कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक विभागाकडून रक्ताने माखलेले फावडे तपासणीसाठी जप्त केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
वडिलोपार्जित जमीन,
आसेगाव शिवारात गट नंबर १२ मध्ये त्रिंबक काळे यांची बारा एकर जमीन आहे. त्यांचे दोन मुले सुभाष काळे व कुशीनाथ काळे या दोघांच्या वाट्यावर सहा सहा एकर जमीन आली आहे. काही वर्षांपूर्वीच कुशीनाथ काळे यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर हा शेती बघतो. ज्ञानेश्वर हा उच्चशिक्षित असून अविवाहित आहे. सुभाष काळे यांच्या पश्चात पत्नी तीन मुले असून १२ एकरासाठी एक विहीर सामाईक आहे. तर ज्ञानेश्वरच्या मालकीची एक स्वतंत्र विहीर आहे. शनिवारी झालेल्या वादाचा विपर्यास थेट जीव घेण्यापर्यंत जाईल, याची कल्पना देखील कोणी केली नसेल. मात्र, या घटनेने परिसरात दिवसभर भयाण शांतता पसरली होती.
-------
फोटो