स्मृतिवन करारावरून युतीमध्ये अस्वस्थता
By Admin | Updated: September 19, 2014 01:15 IST2014-09-19T00:19:22+5:302014-09-19T01:15:47+5:30
औरंगाबाद : गारखेडा परिसरातील ८ एकर जागेवर कारगिल स्मृतिवन विकासासाठी जिल्हा सैनिक मंडळासोबत केलेल्या करारावरून पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीमध्ये वादंग उभे राहिले आहे.

स्मृतिवन करारावरून युतीमध्ये अस्वस्थता
औरंगाबाद : गारखेडा परिसरातील ८ एकर जागेवर कारगिल स्मृतिवन विकासासाठी जिल्हा सैनिक मंडळासोबत केलेल्या करारावरून पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीमध्ये वादंग उभे राहिले आहे. शिवसेनेचा उद्यान विकासाला विरोध नसून लपून केलेल्या कराराला विरोध असल्याचे स्पष्ट केले. तर भाजपाने तटस्थ भूमिका घेतली आहे. दरम्यान, आर.बी. हिल्स व परिसरातील नागरिकांनी आयुक्त पी. एम. महाजन यांची भेट घेऊन उद्यानाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी केली आहे. कारगिल स्मृतिवनाचा करार झाल्याचे कळताच खा.चंद्रकांत खैरे प्रचंड संतापले. त्यांनी पालिकेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. स्मृतिवनाचा तो करार कुणालाही विश्वासात न घेता केला आहे. त्यामुळे तो करार थांबविण्यात येईल. वेळप्रसंगी कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. महापौर कला ओझा यांनी नगररचना विभाग, नगरसचिव विभागाकडून त्या कराराच्या प्रती मागविल्या आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त त्या जागेवर राज्य सैनिक मंडळाने नामफलक लावला.
टीडीआरचे रहस्य कायम...
बबाबाई पवार यांची काही जागा त्या ८ एकरमध्ये आहे. ती जागा वगळून उर्वरित जागा जिल्हा सैनिक बोर्डाकडे भाडेकरारावर दिली. सूत्रांच्या मते टीडीआर किंवा इतर मोबदल्यासाठी संबंधित जागा मालकांनी आयुक्तांची भेट घेतली होती. मागणी मान्य न झाल्यामुळे टीडीआर प्रकरणात काही घोळ झाल्याची शक्यता सूत्रांनी फेटाळली.
नागरी कृती समितीची मागणी
सर्वपक्षीय नागरी कृती समितीने महापौर ओझा, सभापती वाघचौरे, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, आयुक्त महाजन यांची भेट घेऊन उद्यान विकास प्रकरणात पालिकेने कुणाच्या विरोधाला जुमानू नये, अशी मागणी केली. यावेळी नगरसेवक पंकज भारसाखळे, सेवानिवृत्त एसीपी केंद्रे, जसवंतसिंग राजपूत, जगदीश चव्हाण, गंगाधर शेवाळे आदींची उपस्थिती होती.