अनधिकृत नळ कनेक्शन आजपासून तोडणार
By Admin | Updated: December 6, 2014 00:18 IST2014-12-06T00:11:43+5:302014-12-06T00:18:38+5:30
औरंगाबाद : मनपाने पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्तीचे खाजगीकरण केले असून कंत्राट घेणारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी उद्या ६ डिसेंबरपासून अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेणार आहे

अनधिकृत नळ कनेक्शन आजपासून तोडणार
औरंगाबाद : मनपाने पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्तीचे खाजगीकरण केले असून कंत्राट घेणारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी उद्या ६ डिसेंबरपासून अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेणार आहे. या भागात सुमारे २०० हून अधिक नळ अनधिकृत असल्याची माहिती समोर आली असून कंपनी ते नळ उद्या तोडणार आहे.
१ सप्टेंबरपासून कंपनीने समांतर जलवाहिनीचे काम करणे आणि पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू केले. शनिवारी कंपनीची पहिली कारवाई होत आहे. नळ तोडण्यावरून नागरिक आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये ‘राडा’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
१५ दिवसांपूर्वी त्या भागातील नागरिकांना नोटिसा बजावून नळ अधिकृत करण्यास सांगण्यात आले होते; मात्र अनधिकृत नळधारकांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नळ तोडण्याची कारवाई करण्यात येणार आहे. सध्या ४० टक्के पाण्याची चोरी होत आहे. त्याचा फटका अधिकृत नळधारकांना बसत आहे. मनपाचे मोठे नुकसान होत आहे. पाणीपुरवठा बायलॉजच्या १२.४ नुसार ही नळ तोडण्याची कारवाई होणार आहे, असे कंपनीने कळविले
आहे.
डी. डी.अथवा रोख रक्कम
डी. डी. अथवा रोख रक्कम दिली, तरच टँकर अथवा नळ कनेक्शन जोडले जाईल. धनादेश स्वीकारले जाणार नाहीत, असा नियम कंपनीने तयार केला आहे. गुंठेवारी भागातील टँकरसाठी रोख रक्कमच नागरिकांना द्यावी लागत आहे. टँकरने वेळेत पाणीपुरवठा होत नसल्याची ओरड होत आहे.
वेळापत्रक कोलमडले
पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. शुक्रवारी अनेक भागांमध्ये उशिरा पाणीपुरवठा झाला, तर काही भागांत ३० मिनिटेच पाणीपुरवठा झाला. महावितरणकडून पाणी येण्याच्या वेळेतच वीजपुरवठा खंडित झाला.
महावितरणचे कॉल सेंटर, तेथील संबंधितांचे संपर्क क्रमांक कंपनीने प्रसिद्धीस दिलेले नाहीत. त्यामुळे गारखेडा भागात अर्धा तास वीजपुरवठा नव्हता. ज्या भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, त्या भागातील नागरिक विद्युत मोटारी लावून पाणी भरतात. वीज नसल्यामुळे नागरिकांना पाणी भरण्यासाठी अनेक अडचणी आल्या.