अनधिकृत शाळांना चाप

By Admin | Updated: August 4, 2015 00:41 IST2015-08-04T00:41:32+5:302015-08-04T00:41:32+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून, अनेक निष्पाप मुले व त्यांच्या पालकांची हेळसांड सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने

Unauthorized school arcs | अनधिकृत शाळांना चाप

अनधिकृत शाळांना चाप


औरंगाबाद : जिल्ह्यात अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून, अनेक निष्पाप मुले व त्यांच्या पालकांची हेळसांड सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांविरुद्ध मोहीम उघडली असून, आज अशा शाळांपैकी ३ शाळांना कायमचे कुलूप ठोकण्यात आले आहे. यापूर्वी ३० जुलै रोजी ११ शाळा बंद करण्यात आल्या होत्या.
एकीकडे जिल्हा परिषद, महापालिका आणि खाजगी अनुदानित शाळांची पटसंख्या कमी झाल्यामुळे अनेक शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ आली, तर अनेक शाळा शेवटच्या घटका मोजत आहेत, असे असताना जिल्ह्यात खाजगी इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे.
शिक्षण विभागाने जून महिन्यात ज्या शाळांना शासनाची मान्यता नसतादेखील त्या राजरोसपणे सुरू आहेत, अशा अनधिकृत शाळांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली. त्यावेळी शिक्षण विभागाच्या पथकांना जिल्ह्यात तब्बल ४७ शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे आढळले.
यासंदर्भात स्थायी समितीमध्ये सदस्यांनी शिक्षण विभागाला धारेवर धरले होते. गटविकास अधिकारी जाणीवपूर्वक अशा अनधिकृत शाळांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही स्थायी समितीच्या बैठकीत झाला. त्यानुसार ४ गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या.
त्यानंतर शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांची पथके स्थापन करून अनधिकृत शाळांना बंद करण्याविषयीच्या नोटिसा बजावल्या. त्यापैकी अलीकडे ११ शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज सातारा परिसरातील राजदीप इंग्लिश स्कूल, वडगाव कोल्हाटी येथील राजेसंभाजी इंग्लिश स्कूल, ज्ञानेश इंग्लिश स्कूल या तीन शाळा बंद करण्यात आल्या.
या शाळांच्या संस्थाचालकांनी शिक्षण विभागात येऊन शाळा बंद केल्याचे पुरावे सादर केले. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित पथकाला पुन्हा त्या शाळांवर पाठवून त्या खरेच बंद करण्यात आल्या आहेत की नाही, याबद्दलची खातरजमा करून घेतली.

Web Title: Unauthorized school arcs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.