उमरी तालुक्यात गोदाकाठी अवैध वाळूसाठे
By Admin | Updated: July 12, 2014 00:35 IST2014-07-12T00:35:30+5:302014-07-12T00:35:30+5:30
उमरी : तालुक्यातील गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडल्याने दिवसरात्र अवैधरित्या वाळूचा उपसा होत असून गोदावरी नदीकाठ परिसरात वाळूचे साठे करण्यात आले आहेत़

उमरी तालुक्यात गोदाकाठी अवैध वाळूसाठे
उमरी : तालुक्यातील गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडल्याने दिवसरात्र अवैधरित्या वाळूचा उपसा होत असून गोदावरी नदीकाठ परिसरात वाळूचे साठे करण्यात आले आहेत़
बाभळी धरणाचे दरवाजे नुकतेच उघडण्यात आले़ त्यामुळे सर्व पाणी वाहून गेल्याने धरणाच्या वरच्या भागातील गोदावरी नदीचे पात्र कोरडे झाले़ तसेच पावसाळा लांबणीवर पडला़ या बाबी नेमक्या काही कंत्राटदार व वाळूमाफीयांच्या पथ्यावर पडल्या़ यंत्र तसेच मजूर लावून राहेरच्या वरच्या भागात हस्सा, बळेगाव, मनूर, रहाटी, इज्जतगाव, शिंगणापूर, बिजेगाव आदी गावांच्या शिवारात वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात होतो आहे़ याप्रकरणी शेतकऱ्यांनी परिसरातील शेती व रस्त्याचे नुकसान होत असल्याची तक्रार तहसीलदार उमरी यांच्याकडे केली़ उपसा झालेली वाळू याच परिसरात साठवून ठेवली़ त्याची प्रत्यक्ष जागेवर नेऊन पाहणी करण्यात आली़ मात्र तहसीलदारांनी या प्रकरणी कसलीच कार्यवाही केली नाही़ बळेगाव येथे १७ वाळूचे ट्रॅक्टर पकडण्यात आले़ मात्र नाममात्र केवळ २ ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली़ असाच प्रकार आता सर्वत्र सर्रास चालू आहे़ सध्या हजारो ब्रास वाळूचा साठा या भागात असताना त्याचे कसलेच उत्पन्न महसूल खात्याला मिळत नाही़ तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून संबंधितांनी यातून लाखोंचा महसूल बुडविल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे़ (वार्ताहर)