उमरग्यात भाजपाचे गायकवाड उपनगराध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 00:15 IST2016-12-31T00:14:57+5:302016-12-31T00:15:39+5:30
उमरगा : उपनगराध्यक्षपदी भाजपचे हंसराज गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

उमरग्यात भाजपाचे गायकवाड उपनगराध्यक्ष
उमरगा : पालिकेच्या नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या प्रेमलता टोपगे यांनी पदभार घेतल्यानंतर शुक्रवारी उपनगराध्यक्ष, निमंत्रित सदस्य व गटनेत्यांची निवड करण्यात आली. उपनगराध्यक्षपदी भाजपचे हंसराज गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उमरगा पालिकेच्या उपनगराध्यक्ष, निमंत्रित सदस्य व गटनेत्यांच्या निवडीसंदर्भात प्रक्रिया सुरु झाल्यानंतर उपाध्यक्ष पदासाठी भाजपाकडून हंसराज गायकवाड तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून बालाजी पाटील व शिवसेनेकडून पंढरीनाथ कोणे यांचे अर्ज दाखल झाले होते. शेवटच्या क्षणी पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने भाजपचे गायकवाड व सेनेचे कोणे यांच्यात निवडीसाठी मतदान घेण्यात आले. यावेळी सोळा मते भाजपचे हंसराज गायकवाड तर सात मते कोणे यांना मिळाली. संख्यबालानुसार गायकवाड यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या मतदान प्रक्रियेत काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी व नगराध्यक्षांनी भाजपला तर राष्ट्रवादीने सेनेला मतदान केले. हे मतदान हात उंचावून घेण्यात आले. निमंत्रित सदस्यपदासाठी कॉंग्रेसकडून एम.ओ. पाटील, भाजपकडून अरुण इगवे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विशाल माने यांनी अर्ज दाखल केला होता. त्यात संख्याबळानुसार कॉंग्रेसकडून पाटील तर भाजपकडून इगवे यांची निवड करण्यात आली. तर तौलनिक संख्याबळ नसल्याने राष्ट्रवादीच्या विशाल मानेची निवड होऊ शकत नसल्याचे यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सभागृहात सांगितले. पालिका गटनेतेपदी अतिक मुंशी कॉंग्रेस, गोविंद घोडके भाजप, संतोष सगर शिवसेना तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून संजय पवार यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी नगराध्यक्षा टोपगे यांच्या हस्ते सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालिकेचे सदस्य महेश माशाळकर, वशिम शेख, विक्रम मस्के, ललिता सरपे, संगीता औरादे, सविता वाघमारे, जमिलाबानू बेग, शिल्पा शिंदे, सुनंदा वरवटे, राजेश्वरी स्वामी, अनूसया नागदे, इराप्पा घोडके, पंढरीनाथ कोणे, जयश्री चव्हाण, प्रतिभा चव्हाण, रुबिना अत्तार यांच्यासह जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, संताजी चालुक्य, माधव पवार, शौकत पटेल, सतीश साळुंके उपस्थित होते. (वार्ताहर)