छत्रपती संभाजीनगर : मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असलेल्या बॉम्बे मार्केटच्या औषधांचा व्यवसाय चांगलाच भरभराटीस येतोय. या व्यवसायावर उल्हासनगर आणि गुजरातचे नियंत्रण असल्याची बाब उघडकीस आली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या तुम्ही मागाल त्या नावाचे डुप्लिकेट आणि बोगस औषधी महिनाभरात तयार करून देतात. तुम्हाला तुमच्या रुग्णालयाच्या अथवा स्वत:च्या नावाची औषधी तयार करून हवी असेल तर ती सुविधाही उपलब्ध आहे.
बॉम्बे मार्केट औषधी ही वैद्यकीय क्षेत्राला लागलेली मोठी कीड आहे. या क्षेत्रात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याने त्याला आता राजाश्रय मिळू लागला. बोगस कंपन्यांची पाळेमुळे आता अधिक घट्ट होत असून, छत्रपती संभाजीनगर शहरातही अनेक मेडिकल स्टोअर्सवर राजरोसपणे ही औषधी विकली जातेय. शहरात ९० टक्क्यांवर माल उल्हासनगर येथून येतो. उल्हासनगर येथील कंपन्या गुजरात येथून औषधी बनवून घेतात. औषधी तयार करताना त्यासाठी लागणारे मटेरियल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असते. मानवी शरीरासाठी ही औषधी घातक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तीन रुपयांच्या इंजेक्शनवर या कंपन्या १२०० रुपये एमआरपी टाकतात. सामान्य काऊंटरवर विक्री करणाऱ्या मेडिकल चालकाला ते फक्त सात रुपयांना येते. त्यामुळे ते ८० ते ९० टक्के सूट देऊनही मोठ्या प्रमाणात पैसा कमावत आहेत. सर्वसामान्य नागरिक बॉम्बे मार्केटची औषधी ओळखूच शकत नाही, असाही या क्षेत्रातील तज्ज्ञांचा दावा आहे.
फक्त स्पेलिंगमध्ये गडबडबॉम्बे मार्केटमधील अनेक औषध कंपन्या नामांकित कंपन्यांना कॉपी करतात. आपली औषधी हुबेहूब तशीच तयार करतात. नावाच्या स्पेलिंगमध्ये थोडासा बदल करतात. ओमेझ ही नामांकित गोळी सर्वांना माहीत आहे. बॉम्बे मार्केटमध्ये ओमी, ओम, ओमीझ अशी नावे दिली जातात.
कंपन्यांची नावेही अजबअपना दर्ज, सोलो अजब वेगवेगळी नावे औषध कंपन्या ठेवतात. नावावरून ही औषधी बॉम्बे मार्केटची आहे, असे या क्षेत्रातील मंडळींच्या लगेच लक्षात येते.