बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात उद्धवसेनेचे छत्रपती संभाजीनगरात धरणे
By बापू सोळुंके | Updated: December 2, 2024 17:30 IST2024-12-02T17:29:44+5:302024-12-02T17:30:44+5:30
बांगलादेशातील हिंदू विरोधी घटना थांबविण्यासाठी भारत सरकारकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप करीत उद्धव सेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात उद्धवसेनेचे छत्रपती संभाजीनगरात धरणे
छत्रपती संभाजीनगर : ‘करू नका हिंदू द्वेष, शांत ठेवा बांगला देश, इस्कॉन मानवतावादी, नाही दहशतवादी, बांगला देशातील हिंदूंवरील हल्ले, बंद करो, बंद करो’ अशा घोषणा देत बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्धवसेनेच्यावतीने सोमवारी क्रांती चौकात धरणे धरण्यात आले.
बांगलादेशात मागील तीन महिन्यांपासून तेथील अल्पसंख्यांक हिंदू समाजावर अत्याचार, हल्ले होत आहेत. या घटनांच्या निषेधार्थ उद्धवसेनेचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी क्रांतीचौकात आंदोलन करण्यात आले. भारतीय तिरंगा ध्वज बांगलादेशातील कट्टरपंथीय जाळतात, तेथील हिंदूवर अत्याचार करतात, या घटना केंद्र सरकारने गांभिर्याने घ्यायला हव्यात. मात्र, बांगलादेशातील या घटना थांबविण्यासाठी भारत सरकारकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप करीत उद्धवसेनेच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू वैद्य, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर राजू शिंदे, सुभाष पाटील, दिग्विजय शेरखाने, संतोष जेजूरकर, हरिभाऊ हिवाळे, गिरजाराम हाळनोर, संतोष खेंडके, सचिन तायडे, विजय वाघमारे, लक्ष्मीकांत बाखरिया, आशा दातार, सुकन्या भोसले, दुर्गा भाटी, मीना फसाटे, मीना फसाटे, वैशाली आरट, मीरा देशपांडे, दीपाली बोरसे, मनीष बिराजदार आदींची उपस्थिती होती.
बांगलादेशासोबतचे आर्थिक व्यवहार बंद करा: आ. दानवे
यावेळी पत्रकारांशी बोलताना आ. दानवे म्हणाले की, भारतासारख्या माेठ्या देशाने डोळे वटारले तरी बांगला देशाने गप्प बसायला हवे. उलट तेथे भारताचा ध्वज त्या देशात जाळला जातो आणि भारत सरकारकडून कोणतीच कारवाई होत नाही. या देशासोबत क्रिकेट खेळणे बंद करावे, त्यांच्याकडून काेणत्याही वस्तूंची खरेदी करणे बंद करावे. भाजपचे हिंदुत्व केवळ निवडणुकीपुरो असल्याचा आरोप आ. दानवे यांनी केला.