उदगीर, निलंग्यात औपचारिकता बाकी
By Admin | Updated: July 16, 2014 01:25 IST2014-07-16T00:20:17+5:302014-07-16T01:25:34+5:30
उदगीर/निलंगा/औसा : लातूर जिल्ह्यातील उदगीर, निलंगा व औसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षांची निवडणूक लागली आहे़ १

उदगीर, निलंग्यात औपचारिकता बाकी
उदगीर/निलंगा/औसा : लातूर जिल्ह्यातील उदगीर, निलंगा व औसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षांची निवडणूक लागली आहे़ १६ जुलै रोजी या निवडी होणार आहेत़ परंतु, निलंगा व उदगीर पालिकेत आता प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने येथील नगराध्यक्षांच्या घोषणेची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे़ दरम्यान, औसा पालिकेत मात्र काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवल्याने बुधवारी निवडणूक घ्यावी लागणार आहे़
उदगीर, निलंगा व औसा नगरपालिकेत नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे़ निलंगा नगरपालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे़ येथील नगराध्यक्षपद खुल्या संवर्गातील महिलेसाठी सुटले आहे़ याठिकाणी काँग्रेसने विद्या धानोरकर यांच्या रुपाने एकमेव उमेदवार दिला आहे़ अर्ज दाखल करण्यादिवशी काँग्रेसकडून त्यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्याच दिवशी त्यांची निवड निश्चित झाली होती़ बुधवारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणे शिल्लक राहिले आहे़
दरम्यान, उदगीर नगर परिषदेत अध्यक्षपदासाठी विद्यमान नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे व बस्वराज बागबंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते़ मंगळवारी उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी बस्वराज बागबंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला़ त्यामुळे आज १६ जुलै रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत एकमेव उमेदवार राजेश्वर निटुरे यांचाच उमेदवारी अर्ज राहिल्याने त्यांची आज अधिकृत घोषणा होणार आहे़
औशाचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे़ या प्रवर्गातील काँग्रेसच्या नीता सूर्यवंशी व मंजुषा हजारे या दोघींनी अर्ज दाखल केले आहेत़ बुधवारी त्यांच्या निवडीसाठी मतदान घ्यावे लागणार आहे़ (वार्ताहर)