दोन गावांची भागविली तहान
By Admin | Updated: June 30, 2014 00:40 IST2014-06-30T00:07:38+5:302014-06-30T00:40:37+5:30
भास्कर लांडे, हिंगोली पिण्याच्या पाण्यासाठी कितीही पैसे खर्च करण्याची तयारी असताना पाणी मिळत नव्हते. जमिनीची चाळणी केली तरी गावाला पुरेल एवढे पाणी लागत नव्हते.
दोन गावांची भागविली तहान
भास्कर लांडे, हिंगोली
पिण्याच्या पाण्यासाठी कितीही पैसे खर्च करण्याची तयारी असताना पाणी मिळत नव्हते. जमिनीची चाळणी केली तरी गावाला पुरेल एवढे पाणी लागत नव्हते. कोट्यवधी रूपये खर्च केलेल्या सरकारी योजना अपयशी ठरत गेल्या. अधिग्रहणाच्या रडबोंबीने ग्रामस्थांची तहान भागत नव्हती. शहराबाहेर गाव असल्यामुळे जलवाहिनीचा प्रश्नच नव्हता. परिणामी शेतकऱ्यांना औताऐवजी बैल पाण्याच्या टाकीला जुंपावे लागले होते. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरत नव्हता. पाण्यासाठी दाहीदिशा एक करणाऱ्या ग्रामस्थांना सय्यद शामद सय्यद फतरू यांनी दिलेल्या विहिरीच्या पाण्यामुळे पिंपळखुटावासियांच्या घरोघरी नळ वाहू लागले. त्यासाठी कारवाडीतून ३ किलोमीटर अंतरावर पाईपलाईन टाकल्यामुळे सकाळी ३ आणि सांयकाळी ३ तास कडक उन्हाळ्यात मुबलक पाणी मिळू लागले. दुसरीकडे कारवाडीवासियांनादेखील पाणी दिल्यामुळे दोन्ही गावांतील ३३० घरात आज गंगा अवतरली आहे.
हिंगोली शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर कारवाडी हे गाव आहे. नगर पालिकेची हद्द तिथपर्यंत गेली नसल्याने गाव नागरी योजनांशी जोडले नाही. प्रत्यक्षात शहरी वस्ती होत गेल्याने आगामी काही वर्षांतच नकाशातून हे गाव गायब होण्याची शक्यता आहे. शहराच्या पायथ्याला लागून असतानाही गाव विकासापासून कोसोमैल दूर राहिले. शहरात असलेली जलवाहिनी योजना कारवाडीत पोहोचली नसल्यामुळे गावात पाण्याचे संकट निर्माण झाले. कारवाडीपासून ३ किलोमीटर अंतरावरील पिंपळखुटा गावात पाणीटंचाईची तीव्रत्ता अधिकच होती. कारण गावात पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत नव्हता. शासकीय योजना अपयशी झाल्यामुळे पाणी मिळत नव्हते. घराघरात बोअर घेण्याची प्रत्येकाची ऐपत नव्हती. टंचाईपायी पाहुण्यांना हातपाय धुण्यासाठी पाणी देताना ग्रामस्थ हात आखडत होते. परिणामी अगदी सकाळपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा एक कराव्या लागत होत्या. काही ग्रामस्थ कारवाडीतील सय्यद शामद यांच्या विहिरीवरून पाणी आणीत होते. रोडलगतच विहीर असल्यामुळे येथून पाणी नेणाऱ्यांची संख्या वाढली. दरम्यान काही ग्रामस्थांना सय्यद शामद यांच्या विहिरीतून पिंपळखुटा येथे पाईपलाईनद्वारे पाणी नेण्याची कल्पना सुचली. तातडीने सय्यद शामद यांची भेट घेवून पाईपलाईनसाठी विनवणी केली. ग्रामस्थांच्या हालापेष्ठा पाहून शामद यांनी तीन वर्षांसाठी पाणी देण्याचे सुतोवाच केले. पिंपळखुटा ग्रामस्थांनी तातडीने लोकवर्गणी जमवून पाईपलाईन टाकली. पाईपलाईनसाठीचे दिव्य पार केल्यानंतर मोटारीचे बटन दाबताच नळांमार्फत घराघरांत पाणी येवू लागले. पाण्यासाठी उन्हातान्हात वणवण भटकणाऱ्या ग्रामस्थांना मूबलक पाणी मिळाले. घोटभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या ग्रामस्थांना मागील दोन्ही उन्हाळ्यात पाण्याचा स्त्रोत मिळाला. आजघडीला सकाळी ३ आणि सायंकाळी ३ तास पिंपळखुटावासियांसाठी पाणी सोडले जाते. म्हणून सलग दोन उन्हाळ्यापासून २६० घरांची तहान भागली. उन्हाळा लोटत असताना पिंपळखुटा येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ बसली नाही. अधिग्रहण आणि शासकीय योजनांची मदत न घेता केलेल्या या करारामुळे ग्रामस्थांचे भले झाले.
आठवड्यापूर्वी २ गावांना पाणी देवून कापसाच्या दोन बॅगांना पाणी पुरत होते; पण पाऊस गायब झाले आणि वाऱ्याचा वेग वाढला. परिणामी दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत आहे. त्यासाठी अन्य एका बोअरचे पाणी विहिरीत टाकावे लागले; परंतु पंधरा दिवसानंतर चिंता वाढणार आहे.
- सय्यद शामद सय्यद फतरू,
शेतकरी, कारवाडी.
कारवाडी ग्रामस्थांना मिळाले पाणी
शहरात नोकरीस असलेल्या पण कारवाडीत राणाऱ्या ७० घरांनी सय्यद शामद यांच्या विहिरीतून पाणी घेतले. पिंपळखुटाप्रमाणे कारवाडीत पाईपलाईनद्वारे बहुतांश जणांच्या घरांना पाणी आले. शहरातील योजनेचे पाणी मिळत नसताना सय्यद शामद यांनी कारवाडी ग्रामस्थांची हालापेष्टा थांबविली. कोणतीही योजना नसताना पाण्याच्या बाबतीत कारवाडीवासिय निवांत झाले. तिन्ही ऋतूमध्ये ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळाले. म्हणून कोणत्याही योजनेची गरज नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.
पाण्यासाठी उन्हातान्हात वणवण भटकणाऱ्या ग्रामस्थांना मिळाले मुबलक पाणी.
आजघडीला सकाळी ३ आणि सायंकाळी ३ तास पिंपळखुटावासियांसाठी सोडले जाते पाणी.
सलग दोन उन्हाळ्यापासून २६० घरांची तहान भागली. तसेच उन्हाळा लोटत असताना पिंपळखुटा येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईची बसली नाही झळ.