दोन अपघातांत तिघे जागीच ठार
By Admin | Updated: December 27, 2016 00:02 IST2016-12-27T00:00:52+5:302016-12-27T00:02:54+5:30
पाटोदा/ नेकनूर : जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या दोन अपघातांत तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

दोन अपघातांत तिघे जागीच ठार
पाटोदा/ नेकनूर : जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या दोन अपघातांत तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पाटोदा तालुक्यातील चुंबळी फाटा येथे कारच्या धडकेने बाप-लेकाचा मृत्यू झाला. दुसरा अपघात नेकनूर (ता.बीड) जवळील सफेपूर फाटा येथे झाला. कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील बाप-लेकापैकी मुलाचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.
पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी येथील कल्याण शिंदे (५०) हे सुप्पा येथे शिक्षक आहे. सोमवारी सकाळी कल्याण शिंदे व त्यांचा मुलगा वैभव शिंदे (२०) हे दोघे दुचाकी (क्र . एमएच २३ एम - २०१०) वरून पिठ्ठीकडे जात होते. चुंभळी फाटा येथे समोरून येणाऱ्या कार (क्र.एमएच-१५ एफएफ ३९५७) ने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात कल्याण शिंदे व त्यांचा मुलगा वैभव शिंदे या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. कार एवढी भरधाव होती की, दुचाकीला उडवल्यानंतर ती एका झाडावर आदळली, तर दोघांचेही मृतदेह रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात आढळून आले. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दुसरा अपघात बीड तालुक्यातील नेकनूर जवळील सफेपूर फाटा येथे घडला. नेकनूर-मांजरसुंबा रोडवरून जात असलेल्या कारने दुचाकीला (क्र. एमएच-२३ यू-७४९८) ला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात राहुल शहादेव शिंदे (१५, रा.आहेर वडगाव ता.बीड) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे वडील शहादेव शिंदे हे गंभीर जखमी झाले आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर कार चालक वाहनासह फरार झाला. या दोन्ही अपघाताची अनुक्रमे पाटोदा, नेकनूर ठाण्यात नोंद आहे. (वार्ताहर)