एकाच क्रमांकाच्या चक्क दोन ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:11 IST2021-01-08T04:11:38+5:302021-01-08T04:11:38+5:30
औरंगाबाद : एकच क्रमांक असलेले दोन ट्रक असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी बनावट नंबर असलेला ट्रक ...

एकाच क्रमांकाच्या चक्क दोन ट्रक
औरंगाबाद : एकच क्रमांक असलेले दोन ट्रक असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी बनावट नंबर असलेला ट्रक जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता खरा क्रमांक असलेले वाहन आरटीओ कार्यालयाच्या ओव्हरलोड कारवाईत सापडले आहे. शहरामध्ये जुलै महिन्यात आरटीओच्या भरारी पथकाने ओव्हरलोडच्या कारवाईत एक ट्रक जप्त केला. त्यावेळी आरटीओ कार्यालयाने मेमो दिले. तेव्हा खरा क्रमांक असलेल्या वाहनमालकाला बनावट क्रमांकाचेही वाहन असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लक्ष ठेवून बनावट क्रमांक टाकून चालविणारे वाहन पकडून सातारा पोलिसांच्या स्वाधीन केले. सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर आरटीओ कार्यालयाने हे बनावट क्रमांक असलेले वाहन जप्त केले.
बनावट क्रमांक असलेले वाहन गेल्या सहा महिन्यांपासून जप्त आहे. दरम्यानच्या काळात आरटीओ कार्यालयाच्या पथकाला कारवाई करताना खरा नंबर असलेले वाहनही ओव्हरलोड वाहतूक करताना आढळून आले. त्यामुळे आता खरा क्रमांक आणि खोटा क्रमांक असलेली दोन्ही वाहने जप्त आहेत. बनावट क्रमांक टाकलेल्या वाहनाप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी दिली.
तपासणी झाली तर बोगसगिरी उघड
बनावट नंबर प्लेट लावून बिनधास्तपणे वाहन चालविण्याचे प्रकार होत आहे. तपासणी झाली तरच अशी वाहने सापडतात. कारवाईचे प्रमाण कमी असल्यानेच अशाप्रकारे नियमांकडे दुर्लक्ष करून अशी वाहने सुसाट धावत आहेत.