दिवसभरात विकली २ टन तूरडाळ

By Admin | Updated: July 27, 2016 00:52 IST2016-07-27T00:27:09+5:302016-07-27T00:52:33+5:30

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालय व जनरल किराणा मर्चन्टस् असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारपासून जुन्या मोंढ्यात १२० रुपयांत तूरडाळ विक्री करण्यास सुरुवात झाली.

Two tonnes of turdal sold throughout the day | दिवसभरात विकली २ टन तूरडाळ

दिवसभरात विकली २ टन तूरडाळ


औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालय व जनरल किराणा मर्चन्टस् असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारपासून जुन्या मोंढ्यात १२० रुपयांत तूरडाळ विक्री करण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांनी या तूरडाळीसोबत एक किलो मीठाचा पुडाही मोफत देणे सुरु केले आहे. यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून दिवसभरात २ टन तूरडाळ विकल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
एकीकडे खुल्या बाजारातील तूरडाळीच्या भाववाढीला रोखण्यासाठी राज्य सरकारने बाजारात १२० रुपये किलोने तूरडाळ विक्रीचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात जिल्हाधिकारी निधी पांडे यांनी मोंढ्यातील जनरल किराणा मर्चंन्टस् असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. सामाजिक बांधिलकीतून व्यापाऱ्यांनी आपल्याकडील तूरडाळ १२० रुपये किलोने विकावी असे सांगितले होते. त्यानुसार मोंढ्यातील दोन व्यापाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. या योजनेचे सकाळी अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर, अन्न धान्य वितरण अधिकारी छाया पवार, बाजार समितीचे सभापती संजय औताडे, रास्त धान्य दुकानदार संघटनेचे राज्य अध्यक्ष पाटील, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा, मिठालाल कांकरिया, तनसुख झांबड, राजेंद्र शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. जाधवर यांनी सांगितले की, येत्या काळात शहरात ३० ते ४० केंद्रे सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
अजय शहा म्हणाले की, व्यापारी सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवत असतात. आता तरी प्रशासनाने व नागरिकांनी व्यापाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मोंढ्यात व बाहेर व्यापारी स्वत: आणखी १० केंद्रे सुरू करतील व त्याद्वारे १२० रुपये किलोने तूरडाळ विक्री केली जाईल, असे आश्वासन देवेंद्र शेठ यांनी दिले. आभार संजय कांकरिया यांनी मानले.

Web Title: Two tonnes of turdal sold throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.