एकाच मार्गावर २ तिकीटदर
By Admin | Updated: October 31, 2014 00:35 IST2014-10-31T00:29:02+5:302014-10-31T00:35:11+5:30
उदगीर : बीदर रोडवरील रेल्वेगेट जवळील उड्डाणपुलाच्या कामामुळे दूर अंतरावरुन जावे लागत असल्याने एसटीकडून ६ रुपयांची दरवाढ करण्यात आली होती़

एकाच मार्गावर २ तिकीटदर
उदगीर : बीदर रोडवरील रेल्वेगेट जवळील उड्डाणपुलाच्या कामामुळे दूर अंतरावरुन जावे लागत असल्याने एसटीकडून ६ रुपयांची दरवाढ करण्यात आली होती़ त्यामुळे जवळचा रस्ता दिल्यानंतर निलंगा आगाराने दर कमी केले़ परंतु, उदगीर आगाराकडून मात्र पूर्वीच्याच दराने ‘वसुली’ सुरु आहे़ एका मंडळाच्या एसटीकडून एकाच मार्गावर दोन वेगवेगळे तिकिटदर आकारले जात असल्याने प्रवासी संतापले आहेत़
बीदर रोडवरील उड्डाण पुलाच्या कामामुळे एसटीला रिंग रोड उपलब्ध करुन देण्यात आला होता़ त्याअनुषंगाने एसटीकडून या मार्गावर ६ रुपये तिकिट दर वाढविण्यात आले होते़ परंतु, प्रवाश्यांची ओरड लक्षात घेऊन एसटीला शेल्हाळ मार्ग खुला करुन देण्यात आला आहे़ एसटीने या मार्गाचा वापर केल्यास ६ रुपयांऐवजी केवळ ३ रुपये वाढीव तिकिट घ्यावे लागणार आहे़ यासंदर्भात ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित होताच निलंगा आगाराने तात्काळ कार्यवाही करीत तिकिटदरात ३ रुपये कपात केली़ गेल्या आठवडा भरापासून निलंगा आगाराकडून ६ रुपयांऐवजी केवळ ३ रुपये जास्तीचे आकारले जात आहेत़ असे असतानाही उदगीर आगाराने मात्र त्याकडे कानाडोळा करीत प्रवाश्यांची लूट सुरुच ठेवली आहे़ या आगाराच्या एसटीकडून अजूनही ६ रुपये जास्तीचे आकारले जात आहे़ एकाच महामंडळाच्या बसेसद्वारे एकाच मार्गावर असे वेगवेगळे तिकिटदर पाहून प्रवासी संतापले आहेत़ आगाराचे उत्पन्न वाढवून शाबासकी मिळवू पाहण्याच्या नादात उदगीर आगारातील अधिकाऱ्यांनी प्रवाश्यांच्या खिश्याला बसणारी झळ व त्यांचा संताप जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्याचा आरोप प्रवासी अमोल जिवणे, राजकुमार मुर्के, चेतन मिटकरी यांनी केला आहे़(वार्ताहर)