कारवाईत दोन हजार ओळखपत्र जप्त
By Admin | Updated: January 23, 2015 00:55 IST2015-01-23T00:34:35+5:302015-01-23T00:55:50+5:30
कळंब : ज्येष्ठ नागरिक तसेच अपंग प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करता यावा, यासाठी राज्य शासन व परिवहन महामंडळाच्या वतीने योजना राबविल्या जातात.

कारवाईत दोन हजार ओळखपत्र जप्त
कळंब : ज्येष्ठ नागरिक तसेच अपंग प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करता यावा, यासाठी राज्य शासन व परिवहन महामंडळाच्या वतीने योजना राबविल्या जातात. परंतु, परिवहन महामंडळाने मध्यंतरी राबविलेल्या ओळखपत्र तपासणी मोहिमेत अनेक तोतया लभार्थी याचा लाभ उठवित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मोहिमेदरम्यान परिवहन महामंडळाच्या पथकाने दोन हाजराच्या आसपास बनावट व संशयित वाटणारी ओळखपत्रे जप्त केली असून, चौकशीअंती यातील बोगस लाभार्थ्यांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, क्षयरोगी, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, दलित मित्र यासह पुरस्कारप्राप्त नागरिकांसाठी महामंडळाच्या वतीने प्रवास सवलत योजना राबविली जाते. सद्यस्थितीत प्रत्येक बसमध्ये सर्वसाधारणपणे तीस टक्क्याहून अधिक प्रवासी हे यातील काही योजनेचे लाभार्थी असतात. परंतु, काही वेळा अचानक तपासणी केली असता यात बोगस लाभार्थ्यांचाही भरणा असल्याचे महामंडळाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मध्यंतरी आठ दिवस परिवहन महामंडळाच्या वतीने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान संशयित वाटणारी तब्बल दोन हजाराच्या आसपास ओळखपत्र या अधिकाऱ्यांनी जप्त केली. जप्त केलेल्या या कार्डांची तपासणी करून ते बनावट असल्याचे सिध्द झाल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना महाव्यवस्थापकांनी आगार प्रमुखांना दिल्या आहेत. (वार्ताहर)