उर्दू माध्यमाच्या सात वर्गासाठी दोनच शिक्षक
By Admin | Updated: June 28, 2014 01:16 IST2014-06-28T00:23:33+5:302014-06-28T01:16:25+5:30
माणकेश्वर : भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे जिल्हा परिषदेची उर्दू माध्यमाची पहिली ते सातवीपर्यंतची शाळा कार्यान्वित आहे.
उर्दू माध्यमाच्या सात वर्गासाठी दोनच शिक्षक
माणकेश्वर : भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे जिल्हा परिषदेची उर्दू माध्यमाची पहिली ते सातवीपर्यंतची शाळा कार्यान्वित आहे. परंतु, या शाळेवर शिक्षकांची पदे मंजूर असतानाही वर्षभरापासून दोनच शिक्षकांवर कारभार सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
मागील वर्षी मे २०१३ मध्ये या शाळेवरील एकूण चार शिक्षकांच्या विनंतीवरुन बदल्या करण्यात आल्या. परंतु, त्यांच्या जागी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अद्यापही दुसरे शिक्षक उपलब्ध करुन दिलेले नाहीत. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी वारंवार जिल्हा परिषदेत जावून विनंतीही केली. परंतु, जिल्हा परिषदेने याकडेही साफ कानाडोळा केला. परिणामी मागील शैक्षणिक वर्षापासून या शाळेवरील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, मराठी, इंग्रजी सारख्या विषयाला शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून, पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
भरीस भर म्हणून याच शाळेवर जि.प. उर्दूचे नवनी ते दहावीचे विना अनुदानित हायस्कूलही चालू करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या उपलब्ध असलेल्या दोघा शिक्षकांना पहिली ते सातवीच्या वर्गास अध्यापन करणे, प्रशिक्षणास व बैठकीस हजर राहणे, यासारख्या कामांमुळे अध्यापनास वेळ मिळत नाही. परिणामी चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश कमी झाले आहेत. शाळा बंद पडते की काय अशी भीतीही शालेय समिती सदस्य मुस्तफा शेखान यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
उद्देशाला तिलांजली...
या शाळेवर शिक्षकांची मान्य पदे पाच असली तरी तीन पदे अद्याप रिक्त असल्याचे सांगत जिल्हा परिषदेचे या शाळेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे. तसेच शिक्षणाचा हक्क या कायद्यान्वये प्रत्येकाला चांगल्या दर्जाचे शिक्षण देणे बंधनकारक असतानाही जि.प. शिक्षण विभागाकडून सदर उद्देशाला तिलांजली देण्याचे काम होत आहे. समायोजनात माणकेश्वरच्या उर्दू शाळेसासाठी शिक्षक उपलब्ध नाही झाल्यास पुन्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात शाळा भरविण्यात येणार असल्याचेही शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष फैसल मुकेबील व सदस्य शेखान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.