महामार्गचे दोन उपविभाग हलविले औरंगाबादला
By Admin | Updated: February 19, 2015 00:45 IST2015-02-19T00:27:09+5:302015-02-19T00:45:20+5:30
बीड : धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम केंद्राच्या रस्ते वाहतूक व महामार्ग विभागामार्फत होणार आहे.

महामार्गचे दोन उपविभाग हलविले औरंगाबादला
बीड : धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम केंद्राच्या रस्ते वाहतूक व महामार्ग विभागामार्फत होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाची पुनर्रचना नुकतीच केली असून जिल्ह्यातील दोन उपविभाग औरंगाबाद येथील कार्यालयाशी जोडण्यात आले आहेत.
धुळे- सोलापूर व कल्याण- विशाखापट्टणम् हे दोन स्वतंत्र महामार्ग जिल्ह्यातून गेलेले आहेत. धुळे- सोलापूर महामार्ग क्र. २११ चे जिल्ह्यातील अंतर ८० किलोमीटर इतके आहे. कल्याण- विशाखापट्टणम् या महामार्ग क्र. २२२ चे जिल्ह्यातील अंतर ११२ किलोमीटर आहे. धुळे- सोलापूर महामार्गावर चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित आहे. त्यासाठी भूसंपादनाचे काम सुरु आहे. दरम्यान, औरंगाबाद ते येडशी व येडशी ते सोलापूर अशा दोन टप्प्यांत होणाऱ्या या कामांवर केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे थेट नियंत्रण राहील. या विभागाचे कार्यालय औरंगाबाद येथे आहे.
चौपदरीकरण होईपर्यंत धुळे- सोलापूर महामार्ग याच विभागाच्या ताब्यात असेल. त्यामुळे माजलगाव व गेवराई येथील महामार्ग उपविभागांना कामच उरले नाही. त्यामुळे हे दोन्ही उपविभाग औरंगाबाद येथील महामार्ग विभागाशी जोडले (अटॅच) आहेत. ३२ जणांचा कर्मचारीवर्ग आता औरंगाबाद येथील कार्यालयात काम पाहत आहे. ही पूनर्रचना केवळ बीडमध्येच झाली असे नाही तर राज्यभरात अशा प्रकारचे फेरबदल केल्याचे उपकार्यकारी अभियंता व्ही. यू. मचाले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)