दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
By Admin | Updated: April 1, 2015 01:00 IST2015-04-01T00:56:08+5:302015-04-01T01:00:31+5:30
येणेगूर / अचलेर : शाळा सुटल्यानंतर शेतात कामाला गेलेल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.

दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
येणेगूर / अचलेर : शाळा सुटल्यानंतर शेतात कामाला गेलेल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी अचलेर (ता.लोहारा) शिवारात घडली.
घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील सलगरा (मड्डी) येथील अरुण तानाजी जाधव (वय ११) व बळीराम सुरेश राठोड (वय ११) हे दोन्ही मुले गावातीलच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात़ अरूण जाधव व बळीराम राठोड हे दोघे मंगळवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी आले होते़ आई-वडिल गावाजवळ असलेल्या अचलेर शिवारात मजुरीने कामाला गेल्याचे समजल्यानंतर ते दोघे त्यांना भेटण्यासाठी शेताकडे निघाले होते़ हे दोघे अचलेर शिवारातील भीमराव ठेंगील यांच्या शेताजवळ आले असता तहान लागल्याने शेततळ्यात पाणी आणण्यासाठी ते उतरले़ प्रारंभी हातातील बाटली भरून बाहेर काढून ठेवल्यानंतर ते पाणी पिण्यासाठी पुन्हा शेततळ्यात उतरले होते़ मात्र, त्यावेळी त्यांचा पाय घसरल्याने तळ्यातील पाण्यात पडल्याने बुडून दोघांचा मृत्यू झाला़ दरम्यान, या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून मुरूम पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास गोबाडे व विलास राठोड करीत आहेत़ या घटनेने सलगरा मड्डी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़ (वार्ताहर)