दोन चोरट्यांकडून आठ दुचाकी जप्त
By Admin | Updated: July 7, 2015 00:55 IST2015-07-07T00:26:07+5:302015-07-07T00:55:21+5:30
औरंगाबाद : विविध ठिकाणी दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना हर्सूल पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. चोरट्यांकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

दोन चोरट्यांकडून आठ दुचाकी जप्त
औरंगाबाद : विविध ठिकाणी दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना हर्सूल पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. चोरट्यांकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
दिनेश जाधव (रा. खामगाव, ता.नेवासा, जि.अहमदनगर) आणि दीपक वाघ (रा.फुलंब्री) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. हर्सूल पोलीस ठाण्याचे निरीक्षक हाशमी यांनी सांगितले की, हे दोघे चोरीच्या मोटारसायकली ग्रामीण भागात विक्री करीत असल्याची माहिती सहायक पोलीस उपनिरीक्षक कल्याण चाबूकस्वार यांना मिळाली. त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी दिनेशला नेवासा तालुक्यातून अटक केली. त्यानंतर दीपक यास फुलंब्री येथे पकडण्यात आले. या दोघांनी औरंगाबाद, पुणे आणि अन्य शहरांतही वाहनचोऱ्या केल्याचे समोर आले. मुकुंदवाडी, सिडको ठाण्याच्या हद्दीतून त्यांनी प्रत्येकी एक मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. हर्सूल ठाण्याच्या हद्दीतून त्यांनी दोन मोटारसायकली चोरल्या होत्या. पोलीस कोठडीत त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी आठ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. या गाड्या त्यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांना अत्यल्प किमतीत विक्री केल्या होत्या. शेतकऱ्यांकडून या गाड्या जप्त करण्यात आल्याचे निरीक्षक हाश्मी यांनी सांगितले. आरोपींकडून वाहनचोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.