लूट प्रकरणातील दोघे जेरबंद
By Admin | Updated: April 15, 2016 00:47 IST2016-04-15T00:18:59+5:302016-04-15T00:47:58+5:30
नळदुर्ग : पिग्मी एजंटच्या डोळ्यात मिरची टाकून लूट केल्याप्रकरणातील दोघा आरोपितांना स्थागुशा, दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले़

लूट प्रकरणातील दोघे जेरबंद
कारवाई : मोबाईलसह १५ हजार जप्त
नळदुर्ग : पिग्मी एजंटच्या डोळ्यात मिरची टाकून लूट केल्याप्रकरणातील दोघा आरोपितांना स्थागुशा, दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले़ ही कारवाई गुरूवारी दुपारी करण्यात आली असून, अटकेतील दोघांकडून एक मोबाईल व रोख १५ हजार रूपये जप्त करण्यात आले आहेत़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील आपलं घर जवळ ५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास पिग्मी एजंट अशोक माळी यांच्या डोळ्यात मिरची टाकून ३५ हजाराची रोकड चोरट्यांनी लंपास केली होती़ या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या घटनेनंतर पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अपर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे, सहाय्यक पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर, दरोडा प्रतिबंधकचे पोउपनि भास्कर पुल्ली त्यांचे सहकारी पाहेकॉ घुगे, पोना मुल्ला, कळसाईन, चालक शेंडगे, करडे यांनी गुरूवारी नळदुर्ग हद्दीत कारवाई करून सुनिल शेषेराव वाघमोडे (रा़मार्डी ता़लोहारा) व महादेव ज्ञानेश्वर कानडे (रा़जळकोट ता़तुळजापूर) या दोघांना अटक केली़
त्यांच्याकडून एक मोबाईल व रोख १५ हजार रूपये जप्त करण्यात आले आहेत़ दोघांनाही नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़ (वार्ताहर)
प्रवाशाचीही लूट
पोलिसांनी पिग्मी एजंटाच्या लूट प्रकरणात दोघांना अटक केली आहे़ त्या दोघांनी २ एप्रिल रोजीच जळकोट येथील एका इसमाला नळदुर्ग येथे सोडतो, असे म्हणून नेले होते़ त्याला वाटेत मारहाण करून त्याच्याकडील ५ हजार रूपयांची लूट केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली़