ट्रक लुटणाऱ्या दोन दरोडेखोरांना अटक
By Admin | Updated: September 19, 2014 01:13 IST2014-09-19T00:17:36+5:302014-09-19T01:13:14+5:30
औरंगाबाद : ट्रकचालकास अडवून लूटमार करण्याच्या उद्देशाने धुळे येथून कार घेऊन औरंगाबादेत आलेल्या सशस्त्र टोळीतील दोन जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

ट्रक लुटणाऱ्या दोन दरोडेखोरांना अटक
औरंगाबाद : ट्रकचालकास अडवून लूटमार करण्याच्या उद्देशाने धुळे येथून कार घेऊन औरंगाबादेत आलेल्या सशस्त्र टोळीतील दोन जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक कार, दोन तलवारी आणि इतर महत्त्वाचा ऐवज हस्तगत करण्यात आला. ही कारवाई दौलताबाद टी-पॉइंटजवळ झाली.
मोहंमद इरफान खान चौधरी महेबूब खान चौधरी (४०, रा. गणपत चाळ, साकी नाका, मुंबई), जावेदखान फकीर मोहंमद खान (३०, रा. तिरंगा चौक, धुळे), अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार शेख सादिक नूर मोहंमद (रा. मोळवी गंज, धुळे), जुबेर ऊर्फ शेरा (रा. मालेगाव) आणि गुलाब अण्णा (रा. कुसुंबा, ता. धुळे) हे पसार झाले. पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांना धुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार हे ट्रक लुटण्यासाठी दौलताबाद टी-पॉइंट येथे थांबल्याची माहिती मिळाली. खंडागळे आणि त्यांच्या सहकारी तेथे पोहोचले. तेव्हा आरोपी हे श्रीराम फायनान्स कंपनीच्या गोडाऊनसमोर कार उभी करून बाहेर गप्पा मारत असल्याचे दिसले. पोलिसांना पाहून ते अंधारात पळून जाऊ लागले. यावेळी इरफान खान आणि जावेद खान यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. उर्वरित तिघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्याजवळ मोबाईल हँडसेट, वेगवेगळ्या नावाचे वाहन चालविण्याचे परवाने आढळले. आरोपींच्या इंडिका कार क्रमांक एमएच-२० क्यू- ८९४७ मध्येही दोन धारदार तलवारी, एक दोरी, दोन निवडणूक ओळखपत्रे, एक पासपोर्ट फोटो, दोन मोबाईल हँडसेट, बांबूच्या लाठ्या, एक चार्जेबल बॅटरी, असे सुमारे १ लाख ९ हजार ५० रुपयांचे साहित्य सापडले. आरोपींची चौकशी केली असता १० सप्टेंबर रोजी त्यांनी पिलुखेडी, (ता. नरसिंगगड, जि. राजगड, मध्यप्रदेश) येथे दोरी लावून ट्रक लुटल्याचे सांगितले. त्या ट्रकमधील १८ लाख रुपयांचा धागा परस्पर विक्री करून ट्रक धुळे येथे बेवारस अवस्थेत सोडून दिल्याचे सांगितले. पळून गेलेले आरोपी हे कुख्यात दरोडेखोर असून महाराष्ट्रासह परराज्यातही सादिकवर गुन्हे दाखल आहेत. सहायक आयुक्त बाबाराव मुसळे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, फौजदार खंडागळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.