दोन लाखांचा ऐवज पळविला
By Admin | Updated: August 21, 2014 23:55 IST2014-08-21T23:55:49+5:302014-08-21T23:55:49+5:30
औरंगाबाद : उस्मानपुरा परिसरात चोरट्यांनी एका घराच्या खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश करून दोन लाखांचा ऐवज चोरून नेला.

दोन लाखांचा ऐवज पळविला
औरंगाबाद : उस्मानपुरा परिसरात चोरट्यांनी एका घराच्या खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश करून दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. विशेष म्हणजे चोरी झाली त्यावेळी घरात घरमालक झोपलेला होता. ते झोपेतून उठले तर आपण पकडल्या जाऊ, याची तमा न बाळगता चोरट्यांनी चोरीचे धाडस केले.
मुथियान कॉर्नर येथील रहिवासी प्रकाश गणेश पाठक हे काल रात्री नित्याप्रमाणे जेवण झाल्यानंतर घरात झोपी गेले. मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या बेडरूमच्या खिडकीची लोखंडी ग्रील तोडली आणि आत प्रवेश केला. मग चोरट्यांनी घरात असलेल्या कपाटाचे कुलूप तोडले व त्यात असलेले एक लाख रुपये रोख, पाचशे डॉलर आणि सोन्याचे दागिने, असा सुमारे दोन लाखांचा ऐवज घेतला. त्याच वेळी पाठक यांना जाग आली. हे पाहून चोरट्यांनी घरातून पळ काढला.
पाठक यांनी घरातील लाईट लावली असता कपाट तुटलेले, त्यातील ऐवज गायब असल्याचा आणि सामान अस्ताव्यस्त पडले असल्याचे त्यांच्या नजरेस पडले. तात्काळ पाठक यांनी घटनेची माहिती उस्मानपुरा पोलिसांना कळविली.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे, भारत काकडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. नंतर परिसरात चोरट्यांचा शोध घेण्यात आला; परंतु ते काही सापडले नाहीत. उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.