कारची दुचाकीला धडक, दोन जण ठार, एक गंभीर
By | Updated: December 4, 2020 04:15 IST2020-12-04T04:15:04+5:302020-12-04T04:15:04+5:30
आडूळ : शेतातील काम आटोपून घराकडे निघालेल्या शेतकऱ्याच्या दुचाकीला भरधाव कारने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन जण ...

कारची दुचाकीला धडक, दोन जण ठार, एक गंभीर
आडूळ : शेतातील काम आटोपून घराकडे निघालेल्या शेतकऱ्याच्या दुचाकीला भरधाव कारने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे शिवारात घडली. बाप्पासाहेब भाऊसाहेब भावले (५२) व रेखाबाई भागवत चिंतामणी (३२), अशी मयतांची नावे आहेत.
आडगाव जावळे येथील बाप्पासाहेब भावले, रेखाबाई चिंतामणी आणि ताराबाई ढेपले हे तिघे जण दिवसभर शेतातील काम आटोपून दुचाकी (क्र. एमएच-२० डीपी-६३१८) ने घराकडे निघाले होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास औरंगाबादहून बीडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कार (क्र. एमएच-१२ एफएफ-६०७७) ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात बाप्पासाहेब भावले व रेखाबाई चिंतामणी यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर ताराबाई ढेपले (३०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी, टोलनाक्यावरील रुग्णवाहिका कर्मचारी महेश जाधव, विठ्ठल गायकवाड, गणेश चेडे यांनी अपघातग्रस्थांना घाटी रुग्णालयात दाखल केले. आडगावात ही माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी घाटी रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सपोनि. अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलीस करीत आहेत.
फोटाे : कारच्या धडकेत दुचाकी चक्काचूर झाल्याचे दिसत आहे.