कारच्या धडकेने दोघे ठार

By Admin | Updated: December 23, 2015 00:08 IST2015-12-22T23:17:08+5:302015-12-23T00:08:22+5:30

वाळूज महानगर : भरधाव कारने दुचाकीला टक्कर दिल्यामुळे दुचाकीस्वार लिपिक व प्राध्यापक ठार झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री खोजेवाडी फाट्याजवळ घडली

Two killed by a car | कारच्या धडकेने दोघे ठार

कारच्या धडकेने दोघे ठार

वाळूज महानगर : भरधाव कारने दुचाकीला टक्कर दिल्यामुळे दुचाकीस्वार लिपिक व प्राध्यापक ठार झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री खोजेवाडी फाट्याजवळ घडली. कारचालकही गंभीर जखमी असून त्याच्यावर बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्वप्नील बाळासाहेब गायकवाड (२४, रा. पिसादेवी रोड, हर्सूल) व दिग्विजय अंकुश काकडे (२९, रा. आनंदपूर, ता. पैठण) हे दोघे लासूर स्टेशन येथील छत्रपती शाहू महाविद्यालयात नोकरीस होते. गायकवाड हे लिपिक व काकडे हे प्राध्यापक होते. सोमवारी रात्री हे दोघे दुचाकी (क्रमांक एम.एच.-२०, ए.एक्स-३३८९) वर औरंगाबादकडे येत होते. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास खोजेवाडी फाट्याजवळ औरंगाबादहून लासूरकडे सुसाट वेगाने जाणाऱ्या कार (क्रमांक एम.एच.-२०, बी.जे.७६५०) च्या चालकाने दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. गायकवाड व काकडे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले. अन्य वाहनधारकांनी अपघाताची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. फौजदार अशोक झिने व पोलीस कर्मचाऱ्यांनी कारचालक महादेव भानुदास मुळे (३५, रा. बकवालनगर) व दुचाकीवरील दोघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी गायकवाड व काकडे या दोघांना तपासून मयत घोषित केले. गंभीर जखमी कारचालक महादेव मुळे याच्यावर बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरूआहेत.
या प्रकरणी नीलेश गायकवाड यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात कार चालकाविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अशोक झिने करीत आहेत.
दुचाकी व कारचा चुराडा
या भीषण अपघातात दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला असून कारच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर या महामार्गावरून जाणारे अय्युब पटेल यांनी अपघाताची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली होती.
गायकवाड यांचा घटनास्थळीच तर काकडे यांचा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाताना मृत्यू झाल्याची माहिती मृतांच्या नातेवाईकांनी दिली.

Web Title: Two killed by a car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.