सशस्त्र हल्ल्यात दोघांचा मृत्यू; आरोपी अटकेत
By Admin | Updated: October 7, 2014 00:13 IST2014-10-07T00:04:07+5:302014-10-07T00:13:23+5:30
नांदेड : दोन गटांत वाद आणि नंतर झालेल्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले होते. पैकी दोघांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले़

सशस्त्र हल्ल्यात दोघांचा मृत्यू; आरोपी अटकेत
नांदेड : शहरातील जुन्या नांदेड भागातील गाडीपुऱ्यात किरकोळ कारणावरुन रविवारी रात्री उशिरा दोन गटांत वाद आणि नंतर झालेल्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले होते. पैकी दोघांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले़ या प्रकारामुळे जुन्या नांदेडात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे़
गाडीपुरा भागात मोटारसायकल वेगाने चालविण्याच्या मुद्यावरुन वाद झाला़ त्यानंतर मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी आपल्याजवळ असलेल्या कोयत्याने सहा जणांवर वार केले़ परंतु घटनास्थळी नागरिक जमा झाल्याने आरोपींनी एम़ एच़ २२, जी़ २२८० या क्रमांकाची मोटारसायकल तिथेच टाकून पलायन केले़ जखमींपैकी पवन परमार (वय २५) व अजय कौशिक (३४) या दोघांचा मृत्यू झाला़ अन्य एका गंभीर जखमीला हैदराबादला हलविण्यात आले़ रात्री या घटनेनंतर गाडीपुरा, इतवारा परिसरात तणावाचे वातावरण होते.
सोमवारी सकाळी या भागात दगडफेकीच्या किरकोळ घटनाही घडल्या़ जुन्या नांदेड परिसरातील बाजारपेठ बंद राहिली़ जिल्हाधिकारी धीरजकुमार, पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया, अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पोलिस उपअधीक्षक विजय कबाडे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली़ जखमींची विचारपूस केली़ सायंकाळी तणाव बऱ्यापैकी निवळला होता़
(प्रतिनिधी)