कृषी घोटाळाप्रकरणी दोन चौकशी समित्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:21 IST2017-08-11T00:21:28+5:302017-08-11T00:21:28+5:30
जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील घोटाळाप्रकरणी खात्यांतर्गत दोन चौकशी समित्या नेमण्यात आल्या आहेत.

कृषी घोटाळाप्रकरणी दोन चौकशी समित्या
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील घोटाळाप्रकरणी खात्यांतर्गत दोन चौकशी समित्या नेमण्यात आल्या आहेत. लेखापाल सुनील जाधव यांच्यावर ६६ लाख रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे; पण ही रक्कम प्राथमिक असून, मागील सात ते आठ वर्षांपासूनचे रेकार्ड तपासण्यात येत असून, सुमारे ४ ते ५ कोटींचा अपहार झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शहानूरमियाँ दर्गा परिसरातील कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले लेखापाल सुनील जाधव यांनी ६६ लाख १९ हजार रुपयांचा अपहार केल्याचे उजेडात आले. यासंदर्भात प्रकल्प संचालक (आत्मा) विलास रेणापूरकर यांनी तक्रार दाखल करताच उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश टाक यांनी मंगळवारी मध्यरात्री एका खाजगी दवाखान्यात सुनील जाधव यांना अटक केली. ही बातमी गुरुवारी वर्तमानपत्रात प्रसिद्ध होताच कृषी विभागात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी व कृषी विभागातील अन्य कामांसाठी खुद्द कृषी आयुक्त सुनील केंद्रकर मागील तीन दिवसांपासून जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसले होते. केंद्रेकर बुधवारी रात्री पुण्याकडे रवाना झाले. तत्पूर्वी, सुनील जाधव यांनी केलेल्या घोटाळ्याची खात्यांतर्गत सखोल चौकशीचे आदेश दिले. यासाठी कृषी आयुक्तालयाच्या वतीने नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचे अध्यक्ष एस.बी. खेमनार (संचालक, आत्मा) आहेत. तसेच प्रकल्प संचालक आत्मा (जालना) संतोष आळसे, यू.के. घाडगे यांच्यासह दोन लेखापालांचा समावेश आहे. तसेच जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीनेही एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या दोन्ही समित्या घोटाळ्याची स्वतंत्ररीत्या चौकशी करीत आहेत. खेमनार हे मागील आठ दिवसांपासून शहरात तळ ठोकून आहेत. घोटाळा उघडकीस आणणारे आत्माचे प्रकल्प संचालक रेणापूरकर यांच्याकडून आज पोलिसांनी अधिक माहिती जाणून घेतली. घोटाळा कशा प्रकारचा झाला आहे. सुनील जाधव हा वरिष्ठ अधिकाºयांच्या खोट्या सह्या करून परस्पर बँक खात्यातून रक्कम उचलत होता.प्राथमिक चौकशीत ६६ लाख रुपयांचा अपहार झालेला आढळून आला असला तरीही रक्कम ४ ते ५ कोटींपेक्षा अधिक असल्याचे सूत्राने सांगितले.