दोन ग्रामसेवक निलंबित
By Admin | Updated: June 13, 2017 01:04 IST2017-06-13T01:01:31+5:302017-06-13T01:04:54+5:30
औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील बनोटी आणि निंबायती येथील दोन ग्रामसेवकांना आज सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी तडकाफडकी निलंबित केले.

दोन ग्रामसेवक निलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील बनोटी आणि निंबायती येथील दोन ग्रामसेवकांना आज सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी तडकाफडकी निलंबित केले. सोयगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांच्या नियोजित आढावा बैठकीस जाणीवपूर्वक गैरहजर राहणे, या दोन्ही गावांमध्ये राबविण्यात आलेल्या योजनांविषयी अन्य ग्रामसेवकांकडेदेखील कोणतेही रेकॉर्ड न देणे, विकासकामांमध्ये हलगर्जीपणा करणे आदी ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी सांगितले की, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तालुक्यातील हगणदारीमुक्त गावे, शौचालयांचे बांधकाम, इंदिरा आवास योजना आदी विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी सोयगाव येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना उपस्थित राहण्याची पूर्वसूचना दिलेली होती. असे असतानादेखील बनोटी येथील ग्रामसेवक व्ही. एम. पवार आणि निंबायती येथील ग्रामसेवक एस. एस. भालेराव हे दोघेही बैठकीला पूर्वपरवानगीशिवाय गैरहजर राहिले. याशिवाय त्यांनी बनोटी आणि निंबायती येथील विकासकामांचे कोणतेही रेकॉर्ड अन्य ग्रामसेवक अथवा बीडीओ यांच्याकडे दिलेले नव्हते. कामांमध्ये हलगर्जीपणा केल्या प्रकरणात पवार आणि भालेराव या दोन्ही ग्रामसेवकांविरुद्ध सोयगाव येथील आजच्या बैठकीतच निलंबनाची कारवाई करण्यात आली. सोयगाव पंचायत समितीमधील बैठकीला जि. प. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके हेदेखील उपस्थित होते.